Earthquake In Pakistan: भूकंपाने पाकिस्तान हादरला; खैबर पख्तूनख्वामध्ये 9 जणांचा मृत्यू; अनेक घरांचे नुकसान
छत, भिंत आणि घर कोसळण्याच्या घटनांमध्ये नऊ लोक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले. तर या प्रांतातील आठ घरांचे अंशतः नुकसान झाले.
Earthquake In Pakistan: भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. वृत्तसंस्था एएनआयनुसार, पाकिस्तानमध्ये 6.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील जुर्मपासून 40 किमी आग्नेय दिशेला होता. भूकंपाची खोली सुमारे 190 किमी होती. पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, अफगाणिस्तान आणि भारताची राजधानी दिल्लीसह देशाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
खैबर पख्तूनख्वा प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. छत, भिंत आणि घर कोसळण्याच्या घटनांमध्ये नऊ लोक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले. तर या प्रांतातील आठ घरांचे अंशतः नुकसान झाले. (हेही वाचा - Delhi Earthquake: दिल्ली सह उत्तर भारताच्या काही भागात जाणवले भूकंपाचे धक्के; अनेकजण घाबरून घराबाहेर (Watch Video))
तथापि, स्वात जिल्हा पोलीस अधिकारी शफीउल्ला यांनी सांगितले की, जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 150 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सैदू टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी, रेडिओ पाकिस्तानचे पीएमडी डीजी मेहर साहिबजाद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद, पेशावर, लाहोर, रावळपिंडी, क्वेटा, कोहाट, लक्की मारवत, डेरा इस्माईल खान, दक्षिण वझिरीस्तान आणि देशातील इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
त्याचवेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर संस्थांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. डॉनच्या मते, राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामाबादमधील प्रमुख सरकारी रुग्णालये हाय अलर्टवर आहेत. आरोग्यमंत्री अब्दुल कादिर पटेल यांच्या सूचनेनुसार रुग्णालयांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.