Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; जाणून घ्या ठिकाण, वेळ आणि कोण कोण होणार सहभागी

सोमवारी होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील. पदभार स्वीकारल्यानंतर ते अनेक महत्वाच्या आदेशांवर सह्या करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच 100 हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत.

Donald Trump (PC - File Image)

Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आज, म्हणजेच 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तापमान उणे 6 अंश राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच यावेळी शपथविधी सोहळा इनडोअर होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन संसदेत शपथ घेणार आहेत. या सोहळ्याचा एक भाग होण्यासाठी अमेरिकेसह जगातील विविध देशांतील पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. सोमवारी होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील. पदभार स्वीकारल्यानंतर ते अनेक महत्वाच्या आदेशांवर सह्या करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच 100 हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत.

जाणून घ्या शपथविधी कधी होणार-

अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल. भारतीय वेळेनुसार रात्रीचे साडेआठ वाजले असतील. ट्रम्प दुपारी 12 वाजता शपथ घेतील आणि त्यावेळी भारतामध्ये साधारण रात्रीचे 10.30 वाजले असतील.

केवळ 35 शब्दांची शपथ-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घेत असलेल्या शपथेमध्ये केवळ 35 शब्द असतात. ही शपथ अमेरिकन राज्यघटनेचा एक भाग आहे आणि त्याला राज्यघटनेचा मूळ आत्मा म्हटले जाते.

शपथ- ‘I do solemnly swear (or affirm) that I will faithfully execute the Office of President of the United States, and will to the best of my ability, preserve, protect and defend the Constitution of the United States.’

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीदरम्यान दोन बायबल वापरतील. यापैकी एक त्यांना त्यांच्या आईने भेट म्हणून दिले होते, तर दुसरे लिंकन बायबल आहे.

शपथविधी ठिकाण-

तब्बल 40 वर्षांनंतर हा शपथविधी सोहळा इनडोअर होणार आहे. कॅपिटल हिल्स येथील कॅपिटल रोटुंडा येथे हा सोहळा पार पडणार आहे. याआधी 1985 मध्ये अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी कडाक्याच्या थंडीमुळे इनडोअर शपथ घेतली होती. जवळपास चार दशकांनंतर अमेरिकेत हे घडणार आहे. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे ट्रम्प यांना शपथ देतील.

सहभागी होणारे पाहुणे-

या सोहळ्याला राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि जिल बिडेन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश आणि लॉरा बुश, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असे अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. मिशेल ओबामा, उपराष्ट्रपती कमला हॅरिससह काही लोक यात सहभागी होणार नाहीत. (हेही वाचा: TikTok Back in US: बाइटडान्सने अमेरिकेत टिकटॉक सेवा पूर्ववत करण्यास केली सुरुवात, बायटडान्सने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार)

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक परदेशी पाहुणेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मेली, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ, एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले, ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो आणि पोलंडचे माजी पंतप्रधान मातेउझ मोराविएक यांचा समावेश आहे. या सोहळ्यासाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांचे प्रतिनिधित्व उपाध्यक्ष हान झेंग करणार आहेत. तसेच, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे या समारंभात भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व करतील.

व्यावसायिक दिग्गज-

याशिवाय व्यापारी जगतातील अनेक लोकही सामील होणार आहेत. यामध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क, ॲमेझॉनचे जेफ बेझोस, मेटाचे मार्क झुकरबर्ग, ॲपलचे टिम कुक आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमन यांचाही समावेश असेल. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now