Dmitry Utkin: दिमित्री उत्किन यांचा Wagner Group सोबत संबंध काय?

त्यांच्य निधनाबद्दल अनेक चर्चा आहेत.

Dmitry Utkin and Yevgeny Prigozhin | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी मॉस्को येथून आली आणि जगभर खळबळ उडाली. रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात केलेल्या बंडामुळे वॅगनार ग्रुप (Wagner Group) चर्चेत आला. प्रिगोझिन हे त्या ग्रुपचेच प्रमुख होते. या ग्रुपच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असली तरी त्यापाठी आणखी एका व्यक्तीचा मोठा वाठा होता. ती व्यक्ती म्हणजेच दिमित्री उत्किन (Dmitry Utkin). जगभरातील प्रसारमाध्यमे, लष्करी समूह, लष्कराप्रमाणे चालवल्या जाणाऱ्या संघटना आणि सामान्य नागरिकही त्यांच्याबाबत बोलत आहेत. अनेकांना प्रश्न पडला आहे. हे उत्किन कोण?

दिमित्री उत्किन: रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी

रशियामध्ये प्रदीर्घ काळानंतर झालेल्या बंडामुळे चर्चेत आलेल्या वॅग्नर ग्रुपचे येवगेनी प्रिगोझिन हे भलेही ग्रुपचे प्रमुख असतील. त्याला आर्थिक रसद पुरविण्याची आणि भरणपोषणाची जबाबदाही असेलही त्यांच्याकडे. पण, संघटनेची बांधणी आणि लष्कीर सूत्रे मात्र एकवटली होती ती दिमित्री उत्किन यांच्याकडे. ज्यांचा प्रिगोझीन यांच्यासोबत विमानात मृत्यू झाल्याचे समजते. उत्कीन महोदय रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे वॅग्नर ग्रुपच्या सर्व मोहिमांची आखणी आणी त्याबाबत आवश्यक ती भूमिका घेण्याची जबाबदारी होती. ते प्रदीर्घ काळापासून वॅग्नर ग्रुप प्रायव्हेट मिलिट्री कंपनीचे नेतृत्व करत होते.

'वॅग्नर ग्रुप' (Military Call Sign) नाव सूचवण्यामागेही दिमित्री उत्किन यांचाच मेंदू

खासगी लष्करी कंपनीला 'वॅग्नर ग्रुप' (Military Call Sign) नाव सूचवण्यामागेही दिमित्री उत्किनच होते. हे महाशय जर्मनीचा हुकूमशाहा अॅडोल्फ हिटलर याच्या नाझी विचारांचा समर्थक होते, असे बोलले जात असे. इतकेच नव्हे तर हिटलरचा आवडता संगितला रिचर्ड वॅग्नर याच्या नावावरुन त्याने आपल्या कंपनीलाही तेच नाव दिल्याची वंदता आहे. काहण हिटलर आणि या ग्रुपच्या चिन्हामध्ये अनेक समानता आहेत.

रशियाची लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि उत्किन

सन 1970 मध्ये जन्मलेले दिमित्री उत्किन हे रशियाच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेत सक्रीय होते. सन 2013 पर्यंत त्यांनी G.R.U मध्ये सेवा दिली. त्यानंतर त्यांनी स्पेशल फोर्स स्पेत्सनाज (Special Forces Spetsnaz) चे नेतृत्व केले. ज्यामुळे ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचले. सन 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ही माहिती उपलब्ध आहे. त्यांना वॅग्नर ग्रुपच्या संस्थापक सदस्यांपैकीही एक म्हणूनही ओळखले जाते. मात्र, त्यांनी एका संकेतस्थाळाला (बेलिंगकॅट) दिलेल्या मुलाखतीत आपला या ग्रुपच्या स्थापनेत कोणताही हात नाही. मात्र, महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले होते. मात्र येवगेनी प्रिगोझिन यांनी एका ठिकाणी मान्य केले होते की, उत्कीन हेच या ग्रुपचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.

सन 2014 मध्ये जेव्हा वॅग्नर ग्रुपच्या काही भाडोत्री सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यासोबत लढाई केली तेव्हा हा ग्रुप अधिक चर्चेत आला. तेव्हापासून दिमित्री उत्किन हे या ग्रुपचे कमांड राहिले आहेत. पुढे या ग्रुपने सीरिया, सूदान आणि मध्य अफ्रिकेसह, माली, मोजाम्बिक येथेही लढाया केल्या. त्याबद्दल दस्तुरखुद्द व्लादिमीर पुतीन यांनीही त्यांचे कौतुक केले होते. मात्र, पुढे गोष्टी बदलल्या. प्रिगोझिन आणि उत्कीन यांनी थेट पुतीन यांच्याविरोधातच दंड थोपटले. ज्यामुळे पुतीन यांना काही काळ विजनवासात आणि काही पावले पाठिमागे जावे लागले होते. आता अचानक दोघांचाही गूढ मृत्यू झाल्याने अनेक गोष्टी इतिहासाच्या उदरात गडप झाल्या आहेत.