महात्मा गांधी यांना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून चक्क हटवला पुतळा
ही घटना घडली आहे अफ्रिकेतील घाना विद्यापीठात
देशाचे महापिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा त्याग आणि बलिदान सर्वपरिचित आहे. स्वातंत्र्य लढ्यामधील त्यांचा सक्रीय सहभाग याचसोबत वर्णद्वेषाबाबतही त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेमध्ये स्वतः महात्मा गांधी यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. तिथेच या वर्णभेदाविरोधी चळवळीचे बीज रोवले गेले. मात्र आता महात्मा गांधी हे वर्णभेदी (Racist) होते असे ठरवून त्यांचा पुतळा चक्क हलवण्यात आला आहे. ही घटना घडली आहे अफ्रिकेतील घाना विद्यापीठात (University of Ghana). दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता.
गांधींजी हे ‘रेसिस्ट’ होते असे मानून, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली. इतकेच नव्हे तर या गोष्टीसाठी आंदोलनही सुरु झाले. यामुळेच नाईलाजाने विद्यापीठाला हा पुतळा हटवला लागला. पुतळा बसवल्यापासूनच म्हणजे दोन वर्षांपासून तो हटवण्याची मागणी होत होती.
महात्मा गांधीं यांचे अफ्रिकेतील समुदायांबद्दलचे विचार हे अफ्रिका खंडाचा अपमान करणारे होते, तसेच ते काळे आफ्रिकन (black Africans) लोक यांच्या विरुद्ध होते त्यामुळे त्यांची प्रतिमा कुठेही लावली जाऊ नये असे आंदोलकांनी म्हणणे होते. जगभरात महात्मा गांधींना अहिंसेचे प्रतीक मानले गेले आहेत. अशात अफ्रिकेतील घाना या देशाने मात्र गांधीजींना वर्णभेदी ठरवले आहे. 2016 मध्ये या पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले होते.