Dallas Museum of Art: प्रेयसीशी भांडण केल्यानंतर संग्रहालयात घुसला तरुण; केली 40 कोटींच्या मौल्यवान कलाकृतींची तोडफोड
डॅलस म्युझियमचे संचालक ऑगस्टीन आर्टेगा यांनी सांगितले की, नुकसान निश्चित करण्यासाठी ते विमा कंपन्यांशी चर्चा करत आहेत
गर्लफ्रेंडसोबत (Garlfriend) भांडण झाल्यानंतर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे रिएक्ट करतात. मात्र अमेरिकेमधील (US) एका व्यक्तीने गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर केलेले कृत्य ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. युनायटेड स्टेट्समध्ये बुधवारी एका 21 वर्षीय तरुणाचे त्याच्या मैत्रिणीशी भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात त्याने डॅलस म्युझियम ऑफ आर्टमध्ये (Dallas Museum of Art) प्रवेश केला व या ठिकाणी तरुणाने सुमारे 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जावा; जवळ 40 कोटी रुपयांच्या गोष्टींची तोडफोड केली.
इंडिपेंडेंटनुसार, डॅलस पोलिसांनी सांगितले की, या तरुणाचे ब्रायन हर्नांडेझ (Brian Hernandez) असे असून तो फक्त 21 वर्षांचा आहे. सध्या पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, हर्नांडेझने बुधवारी रात्री साधारण 10 वाजता संग्रहालयाचा काचेचा दरवाजा धातूच्या खुर्चीने तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने स्टूलचा वापर करून दोन डिस्प्ले केसेस तोडल्या व अनेक प्राचीन कलाकृतींचे नुकसान केले. यामध्ये दोन भांड्यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत $5 दशलक्ष सांगितली जात आहे. तोडफोड झालेल्या वस्तू या 5 व्या आणि 6 व्या शतकातील तीन प्राचीन ग्रीक कलाकृती आहेत.
इंडिपेंडंटच्या मते, नुकसानीचा प्रारंभिक अंदाज सुमारे $5,153,000 आहे. डॅलस म्युझियमचे संचालक ऑगस्टीन आर्टेगा यांनी सांगितले की, नुकसान निश्चित करण्यासाठी ते विमा कंपन्यांशी चर्चा करत आहेत. पोलीस अहवालात म्हटले आहे की, मोशन डिटेक्टर अलार्म वाजल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हर्नांडेझला संग्रहालयाच्या मुख्य मजल्यावर पकडले. तो संग्रहालयात काय करत आहे असे विचारले असता, हर्नांडेझने सांगितले की त्याचे त्याच्या गर्लफ्रेंडशी भांडण झाले असून तो रागाच्या भरात संग्रहालयात आला आहे. (हेही वाचा: हॉलीवूड अभिनेता Johnny Depp ने घेतला भारतीय रेस्टॉरंट 'वाराणसी'मध्ये भोजनाचा आस्वाद; तब्बल 49 लाखांचे झाले बिल)
सीएनएनच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दुसर्या दिवशी संग्रहालय उघडले गेले मात्र हर्नांडेझने कथितरित्या नुकसान केलेल्या साइट्स बंद केल्या गेल्या आहेत जेणेकरून तपास अखंडपणे चालू राहील. दरम्यान नुकतेच पॅरिसमधील लूवर म्युझियममधील जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगचे नुकसान करण्याच्या प्रयत्न घडला होता. लूवर म्युझियममध्ये वृद्ध महिलेच्या रूपात गेलेल्या एका व्यक्तीने मोनालिसाचा पेंटिंगच्या संरक्षक काचेवर केक फेकला होता.