बीजिंग एअरपोर्टतर्फे 1,255 उड्डाणे रद्द; चीनमध्ये कोरोना व्हायरसची नवी लाट येण्याच्या भीतीपोटी घेतला निर्णय

बुधवारी कोरोना व्हायरसचे 31 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची भीती आहे.

Beijing's Airport (Photo Credits: AFP)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीनने पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले होते. परंतु, कोविड-19 (Covid-19) चे नवे रुग्ण पुन्हा आढळून आल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी बीजिंग एअरपोर्टतर्फे (Beijing Airports) 1,255 उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती AFP न्यूज एजेंसीने दिली आहे. बुधवारी (17 जून) कोरोना व्हायरसचे 31 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना बीजिंग सोडण्याचे आवाहन केले आहे. चीनने मोठ्या प्रयत्नांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रित केला होता.

कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत 10 हजार लोक सापड्याची शक्यता आहे. झिनफादी होलसेल मार्केटमधून कोरोनाचा संसर्ग पुन्हा झाल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे बीजिंग शहारातील एकूण 30 रहिवासी कॉलनी लॉकडाऊन केल्या आहेत. त्याचबरोबर ठरलेली 1,255 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. राज्यातील एकूण 70% उड्डाणे ही बीजिंगच्या मुख्य विमानतळावरुन होतात.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे शहरात मध्यम आणि अधिक धोका असलेल्या ठिकाणातील रहिवाशांना प्रवासाची बंदी घालण्यात आली आहे. तर बीजिंग शहर सोडून जाण्यापूर्वी न्यूक्लिक अॅसिड टेस्ट करणे गरजेचे असणार आहे.

दरम्यान सुरु करण्यात आलेल्या शाळा देखील पुन्हा बंद करण्यात आल्या असून ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. बीजिंगचे शहर प्रवक्ते जू हेजियान यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 'राजधानी बिजिंगमध्ये कोविड-19 ची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.' तसंच कोविडच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून बिजिंगमधील 11 बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.