Canada to Highten Security Checks for Indian Traveller: भारतात जाणाऱ्या लोकांची होणार विशेष तपासणी; वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
कॅनेडियन एअर ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी (CATSA) ला विमानतळावरील सुरक्षा तपासण्या वाढवण्याचे काम सोपवण्यात आले आहे, यामध्ये एक्स-रे मशिनद्वारे बॅग तपासणे आणि प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे यांचा समावेश आहे.
Canada to Highten Security Checks for Indian Traveller: भारत आणि कॅनडामधील (Canada) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो सरकारने भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. ज्यामुळे आता भारतीय प्रवाशांना विमानतळावर कडक सुरक्षा तपासणीतून जावे लागणार आहे. कॅनेडियन न्यूज एजन्सी सीबीसीनुसार, अधिकाऱ्यांनी याचे कारण दिलेले नाही. कॅनडाच्या परिवहन मंत्री अनिता आनंद यांनी एक निवेदन जारी केले आहे की, अधिक खबरदारी घेण्यासाठी त्यांच्या सरकारने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याने 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाने प्रवास न करण्याचा इशारा दिला होता.
दहशतवादी पन्नू एक व्हिडिओ जारी केला होता आणि 1984 च्या शीख दंगलीचा बदला घेण्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे. कॅनेडियन एअर ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी (CATSA) ला विमानतळावरील सुरक्षा तपासण्या वाढवण्याचे काम सोपवण्यात आले आहे, यामध्ये एक्स-रे मशिनद्वारे बॅग तपासणे आणि प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. CATSA ने भारतात येणाऱ्या प्रवाशांना सूचना पाठवून उड्डाणाच्या किमान चार तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगितले आहे.
खलिस्तान समर्थक शीख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने पंजाबमधील मोहाली येथील एअरपोर्ट रोड कुंब्रा येथे देशविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या घोषणांमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे 'हिंदू दहशतवादी' असे वर्णन करण्यात आले होते. पन्नूने व्हिडिओ जारी केला आणि शीख तरुणांना 17 नोव्हेंबर रोजी पंजाबमधील अमृतसर आणि चंदीगड विमानतळ बंद करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Canadian PM Justin Trudeau: ‘सर्व हिंदू मोदी समर्थक...’; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे वक्तव्य; देशात खलिस्तानी असल्याची कबुली)
रॉयल कॅनेडियन पोलिसांनी नुकताच कॅनडामध्ये संघटित गुन्हेगारी, खंडणी इत्यादी गुन्ह्यांमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. अशा स्थितीत या आरोपांचा कॅनडा सरकारच्या नव्या आदेशावर प्रभाव असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये अलीकडील तणाव कायम आहे. गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये सहा भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडा सोडावा लागला होता.