Vodafone ची भारतातील सेवा बंद होण्याच्या वाटेवर; कंपनी तोट्यात चालली असल्याचे IANS वृत्त
या कंपनीला भारतात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून सध्या कंपनीची आर्थिक म्हणावी तितकी चांगली नसल्याचे IANS ने सांगितले आहे.
भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक व्होडाफोन (Vodafone) सेवा ही लवकरच भारतातील आपली सेवा बंद करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेने दिले आहे. या कंपनीला भारतात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून सध्या कंपनीची आर्थिक म्हणावी तितकी चांगली नसल्याचे IANS ने सांगितले आहे. दरम्यान, कंपनीकडून ही अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र असे झाल्यास याचा मोठा फटका व्होडाफोनच्या भारतातील लाखो ग्राहकांना बसणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये पुढे आलेली कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. एकाहून एक सरस अशा ऑफर्स ग्राहकांना देऊन या कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले. उत्तम कॉलिंग सेवा, नेटवर्क आणि डेटा पॅकमुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांचे ग्राहक जिओ कडे वळाले. याचा फटका अन्य कंपन्यांसह व्होडाफोनलाही बसला आहे.
हेदेखील वाचा- Jio कडून फ्री कॉल सर्विस बंद केल्यानंतर वोडाफोन-आयडिया देणार ग्राहकांना 'ही' सुविधा
त्यामुळे जिओ कंपनीची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आपल्याला भारतीय बाजारात तग धरुन राहता यावे यासाठी आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आलं होते. असे असताना देखील आता व्होडाफोन कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. कंपनीचं पॅकअप झालं आहे आणि कंपनी कोणत्याही क्षणी भारतातील सेवा बंद करू शकते, असे आयएएनएसच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
जिओने वाढती लोकप्रियता लक्षात घेता अशी स्थिती कायम राहिली तर व्होडाफोन सारख्या अन्य कंपन्यांचे भारतातील भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. बाजारातील भांडवलात झालेली घट आणि ऑपरेशनल लॉस वाढल्यानेच व्होडाफोन कंपनी या निर्णयाप्रत पोहचल्याचेही सांगण्यात येत आहे.
TRAI च्या नव्या नियमांनुसार आजपासून एअरलसेल (Aircel) टेलिकॉम कंपनीची सेवा 1 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बंद झाली आहे. TRAI च्या नव्या नियमांचा फटका एअरसेल च्या ग्राहकांना बसणार आहे.