धक्कादायक! One Plus Nord 2 फोनचा पुन्हा एकदा झाला स्फोट; वकिलाच्या खिशातच फुटला नवीन फोन, तक्रार दाखल
मात्र देशात वनप्लस नॉर्ड सीरीजच्या फोनमध्ये स्फोटांच्या घटना समोर येत आहेत. वनप्लस नॉर्ड 2 (One Plus Nord 2 5 G) मध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर आली होती. आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G मध्ये चक्क एखाद्या बॉम्बसारखा स्फोट झाला आहे
‘वनप्लस’ (One Plus) ही भारतामधील फोनबाबतची एक लोकप्रिय कंपनी आहे. मात्र देशात वनप्लस नॉर्ड सीरीजच्या फोनमध्ये स्फोटांच्या घटना समोर येत आहेत. वनप्लस नॉर्ड 2 (One Plus Nord 2 5 G) मध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर आली होती. आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G मध्ये चक्क एखाद्या बॉम्बसारखा स्फोट झाला आहे. वनप्लस नॉर्ड 2 5G बाबतची ही नवी घटना राजधानी दिल्लीत समोर आली आहे. दिल्लीस्थित वकील गौरव गुलाटी यांच्या खिशात नवीन वनप्लस नॉर्ड 2 5G चा स्फोट झाला आहे.
गौरव गुलाटी यांनी सांगितले की, ते चेंबरमध्ये असताना त्यांच्या नवीन वनप्लस नॉर्ड 2 5G ला आग लागली. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाच्या चेंबरमध्ये या फोनला आग लागल्यानंतर त्याचा एखाद्या बॉम्बसारखा स्फोट झाला. गुलाटी म्हणाले की, त्यांनी त्यांच्या कोटमधून धूर निघताना पाहिले. मात्र काही समजायच्या आधी फोनचा स्फोट झाला होता. स्फोटामुळे गौरवला पोट, कान आणि डोळ्याला दुखापत झाली. फोनमध्ये आग लागल्यानंतर निघणाऱ्या धूरामुळे त्याला श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गौरव पुढे म्हणाले की, त्यांनी वनप्लसविरोधात पोलिस तक्रार केली आहे. आणि ते कंपनीवर कायदेशीर कारवाई देखील करतील. फोनमध्ये स्फोट झाल्यानंतर गौरवने ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. यानंतर वनप्लसने त्यांच्याशी संपर्क साधला. वनप्लसकडून एक व्यक्ती गौरवला भेटायला आली होती, त्याला फोन तपासणीसाठी घेऊन जायचा होता परंतु गौरवने पोलीस केस असल्याने फोन देण्यास नकार दिला.
या संपूर्ण घटनेमध्ये वनप्लसच्या भूमिकेबद्दल गौरव असमाधानी आहेत. त्यांनी त्याने सांगितले की सध्या तरी त्यांना वनप्लसकडून कोणतीही मदत देण्यात आलेली. गौरव यांच्या मते ते अक्षरशः खिशात ‘डेथ सर्टिफिकेट’ घेऊन चालले होते. या स्फोटामध्ये स्वतःचा जीव वाचल्याबद्दल ते स्वतःला भाग्यवान समजतात. (हेही वाचा: Oppo आणि Nokia ने एकमेकांच्या विरोधात दाखल केला खटला, जाणून घ्या यामागील कारण)
दरम्यान, त्यांनी सुमारे 10 दिवसांपूर्वी वनप्लस नॉर्ड 2 5 जी खरेदी केला होता. आणि अवघ्या 2-3 दिवसांपासून त्यांनी तो वापरण्यास सुरुवात केली होती. स्फोटाच्या वेळी फोन सुमारे 90 टक्के चार्ज होता.