Chandra Grahan 2023 Date: 28-29 ऑक्टोबरच्या यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा सुतककाळ कधी होणार सुरू?

हे 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल.

Chandra Grahan प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

अवकाशीय घटनांचं कुतूहल अनेकांना असतं त्यामध्येही ग्रहणं असेल तर चंद्र-सूर्याचं वेगळच रूप अनुभवता येऊ शकतं. 2023 वर्षामधील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) यंदा 28-29 ऑक्टोबर दरम्यान दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार असल्याने त्याचं कौतुक जरा जास्तच आहे. आश्विन पौर्णिमेच्या उत्तर रात्री 1.05 ते 2.23 या वेळेत ग्रहण दिसणार आहे. भारतासोबतच हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेच्या भागामध्ये दिसणार आहे. Solar Eclipse, Lunar Eclipse in October 2023: ऑक्टोबर महिन्यात दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण; जाणून घ्या तारीख, सुतक कालावधी आणि इतर तपशील .

ऑक्टोबर 2023 चंद्रग्रहणाचा सुतककाल काय? 

जगात ग्रहण हा कुतूहलाचा विषय असला तरीही भारतीयांसाठी त्याच्याशी निगडीत अनेक धार्मिक गोष्टी देखील असतात. त्यापैकीच एक म्हणजे सुतककाळ. सुतककाळ हा ग्रहण सुरू होण्यापूर्वी पाळला जातो. चंद्रग्रहणामध्ये हा सुतककाळ ग्रहणाच्या वेळेच्या आधी 9 तास सुरू होतो. त्यामुळे या 28-29 ऑक्टोबर दरम्यानच्या चंद्रग्रहणामध्ये सुतककाळ 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी सुरू होईल. सुतककाळामध्ये देवदर्शन बंद ठेवलं जातं. अन्नपदार्थ शिजवणं टाळलं जातं. ग्रहण संपल्यानंतर शुद्धिकरणाचा विधी करून सारी साफ सफाई करून पुन्हा कामं सुरू केली जातात.

जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘ खंडग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते. 28 ऑक्टोबरचं चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हिंदू धर्मीयांमध्ये ग्रहणांच्या काळात नवजात बालकं, नवमाता, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध आणि प्रामुख्याने गरोदर महिला यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना विशिष्ट गोष्टींपासून दूर राहण्याचा, पूजा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो.

(टीप: सदर लेख  केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही)