राजस्थानची राजधानी जयपूरच्या (Jaipur) चौमूं (Chaumu) शहरात ब्लूटूथ संबंधी एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जर तुम्हीदेखील तुमच्या कानात ब्लूटूथ इयरफोन (Bluetooth Headphone) घालत असाल तर सावध रहा, कारण हा ब्लूटूथ इयरफोन तुमच्या कानात कधीही फुटू शकतो. चौमूं भागातील उदयपुरिया गावात, एका तरुणाच्या कानात लावलेल्या ब्लूटूथ इयरफोनचा असाच अचानक मोठा स्फोट झाला. युवकाच्या दोन्ही कानांना दुखापत झाल्यावर त्याला जखमी अवस्थेत शहरातील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राकेश नागर असे मृताचे नाव आहे तो 26 वर्षांचा होता. डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. रुग्णालयाचे डॉक्टर एल.एन. रुंडला यांनी सांगितले की, मृतक त्याच्या कानात इयर फोन घालून बोलत होता. अचानक या इयरफोनचा स्फोट झाला आणि राकेश बेशुद्ध पडला. त्यानंतर या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ब्लूटूथचा कानात स्फोट झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे या तरुणाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, अचानक कानात ब्लूटूथचा स्फोट झाल्यामुळे राकेशला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, राकेश अनेकदा त्याच्या कानात ब्लूटूथ घालून तासनतास फोनवर बोलत असे. (हेही वाचा: Ola Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती)
यापूर्वी जून 2021 मध्ये कुंभमेळ्याचे वरिष्ठ लेखापाल संजय शर्मा यांचा ब्लूटूथ इयरफोन फुटल्यामुळे हरिद्वारमध्ये निधन झाले होता. जिल्हा मुख्यालय रोशनबादच्या कोर्ट कॉलनीत हा अपघात झाला होता. संजय शर्मा रात्री त्यांचा मोबाईल वापरत होते व त्यांनी ब्लूटूथ इयरफोन लावले होते. संशयास्पद परिस्थितीत इयरफोनचा स्फोट झाला.