Open AI Vioce Cloning: व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारे तंत्रज्ञान विकसित, सुरक्षेच्या कारणामुळे सार्वजनिक होणार नाही

‘ओपनएआय’ने याआधीच संबंधित व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही संबधित व्यक्तीच्या आवाजाची क्लोनिंग करणार नाही, असे म्हटले आहे.

चॅटबॉटची (ChatBot) निर्मिती करणारी ‘ओपनएआय’ (OpanAI) ही कंपनी आता ‘व्हॉईस असिस्टंट बिझिनेस’मध्ये (ध्वनी सहाय्यक उद्योग) उतरली आहे. एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारे तंत्रज्ञान या कंपनीने विकसित केले आहे. जनसुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान आताच सार्वजनिक करण्यात येणार नाही, असेही कंपनीने सांगितले. कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे 15 सेकंदांचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करणयास सक्षम असू शकतात. (हेही वाचा -  Elon Musk देणार ChatGPT ला टक्कर देणार; पुढील आठवड्यात उपलब्ध होणार Grok 1.5 AI Chatbot, X यूजर्सलाही घेता येणार लाभ)

या कंपनीने ‘व्हॉईस इंजिन टेक्नोलॉजी’ची नुकतीच घोषणा केली असून तिच्या नावाच्या अनुषंगाने ‘ट्रेडमार्क’साठी अर्ज देखील केला आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येतील. सध्या या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याचा धोका अधिक आहे. जगभरामध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने आम्ही काळजी घेत आहोत असे कंपनीने म्हटले आहे.

‘ओपनएआय’ने याआधीच संबंधित व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही  संबधित व्यक्तीच्या आवाजाची क्लोनिंग करणार नाही, असे म्हटले आहे. तसेच क्लोनिंग करण्यात आलेला आवाज हा ‘एआय’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे, असेही जाहीर करण्यात येईल, असे सांगितले आहे. ‘ओपनएआय’ने तयार केलेला चॅटबॉट आणि ‘डीएएलएल-ई’ या ईमेज जनरेटरने सध्या जगभर धुमाकूळ घातला आहे. ‘सोरा’ हे व्हिडिओ जनरेटरदेखील कंपनीने तूर्त जारी केलेले नाही.