Google Maps ला स्वदेशी पर्याय MapmyIndia; भारतीय बनावटीच्या मॅपिंग सर्व्हिससाठी ISRO सोबत करार

व्हॉट्सअॅप, ट्विटर नंतर आता गुगल मॅपलाही स्वदेशी पर्याय शोधला गेला आहे. यासाठी स्वदेशी अॅप मॅप माय इंडिया सुरु करण्यात येणार आहे.

ISRO (Image: PTI)

भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter) नंतर आता गुगल मॅपलाही स्वदेशी पर्याय शोधला गेला आहे. यासाठी स्वदेशी अॅप 'मॅप माय इंडिया' (MapmyIndia) सुरु करण्यात येणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनाजेशन (Indian Space Research Organisation) यांनी मॅपमायइंडिया सोबत करार केला असून त्यांच्याद्वारे भारतामध्ये लोकेशन बेस्ड सर्व्हिस निर्माण करण्यात येणार आहे. मॅपमायइंडियानुसार ही सेवा गुगल मॅपला (Google Maps) पर्याय ठरु शकते.

भारतामध्ये बहुतांश ठिकाणी डिजिटल मॅपचा वापर केला जात नाही. मॅप माय इंडिया ही भारतीय कंपनी असल्यामुळे भारतातील अनेक जागेचे अचूक मॅप्स दाखवू शकतो आणि भारत सरकारने नेमून दिलेल्या सीमारेखांची सुद्धा आम्हाला योग्य कल्पना आहे, अशी माहिती कंपनीची सीईओ रोहन वर्मा यांनी दिली आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मॅप माय इंडियाला देखील सहभागी करुन भारतीय युजर्संना अचूक माहिती देणे, हा आमचा उद्देश आहे. इस्त्रोसोबत करार केल्यामुळे भारतातील सर्व ठिकाणांच्या स्पष्ट सॅटलाईट इमेजेस आम्हाला मिळतील आणि या इमेजेसचा वापर करुन भारतीयांसाठी अगदी सोयीस्कर अशी मॅपिंग सर्व्हिस निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. यामध्ये युजर्स सर्व मॅप्स एका पक्षाच्या दृष्टीने बघू शकतील आणि यासोबतच रस्त्यावर होणारी हालचाल, हवामान आणि प्रदुषण यांच्या विषयी देखील माहिती मिळू शकेल. तसंच ठिकठिकाणी होणारे पूर आणि दरड कोसळणे याबद्दलही यात अपडेट्स मिळतील, असेही ते म्हणाले.

इस्त्रो किंवा मॅप माय इंडियाकडून ही सर्व्हिस लॉन्च करण्याची अद्याप कोणतीही तारीख जारी करण्यात आलेली नाही. स्पेस सेक्टरमध्ये खाजगी कंपन्यांना प्रवेश मिळण्याचे मोदी सरकारकडून घोषित झाल्यानंतर इस्त्रोने वेगवेगळ्या विभागांसाठी काही खाजगी कंपन्यांसोबत करार केले आहेत. मॅप माय इंडियासोबत नुकताच करार करण्यात आला आहे.