Jio 5G Coverage: जिओने आणखी 27 शहरांमध्ये विस्तारीत केले 5जी कव्हरेज; महाराष्ट्रातील 'या' शहराचा समावेश

आमंत्रित वापरकर्त्यांना 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटाचा लाभ कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळेल.

5G internet | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) बुधवारी 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी 27 शहरांमध्ये 5जी (5G) सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासह, जिओने आतापर्यंत देशातील 331 शहरांमध्ये 5जी सेवेचा विस्तार केला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की 'Jio True 5G' आता आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमधील आणखी 27 शहरांमध्ये उपलब्ध आहे.

निवेदनानुसार, 8 मार्च 2023 पासून देशांतील आणखी 27 शहरांमध्ये जिओ वापरकर्त्यांना 'वेलकम ऑफर' दिली जाईल. या अंतर्गत, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps पर्यंतच्या वेगाने अमर्यादित डेटा मिळू शकतो. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, 2023 च्या अखेरीस जिओची 5G सेवा देशभरात पसरेल.

जिओची 5जी सेवा आता ताडीपत्री (आंध्र प्रदेश), भाटापारा (छत्तीसगड), अनंतनाग (जम्मू आणि काश्मीर), भद्रावती, रामनगरा, दोड्डाबल्लापुरा, चिंतामणी (कर्नाटक), चांगनासेरी, मुवट्टुपुझा, कोडुंगल्लूर (केरळ), कटनी मुरवारा (मध्य प्रदेश), सातारा (महाराष्ट्र), पठाणकोट (पंजाब), पोल्लाची, कोविलपट्टी (तामिळनाडू), सिद्धीपेट, संगारेड्डी, जगतियाल, कोठागुडेम, कोडाड, तंदूर, जहिराबाद, निर्मल (तेलंगणा), रामपूर (उत्तर प्रदेश), काशीपूर, रामनगर (उत्तराखंड) आणि बांकुरा (पश्चिम बंगाल) येथे उपलब्ध झाली आहे. (हेही वाचा: WhatsApp घेऊन येत आहे नवीन अप्रतिम फीचर, अनोळखी आणि स्पॅम नंबरवरून येणारे कॉल तुम्ही करु शकाल म्यूट)

कंपनीने सांगितले की ज्या शहरांमध्ये 5जी सेवा सुरू करण्यात आली आहे, तेथे जिओ वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफरसह आमंत्रित केले जाईल. आमंत्रित वापरकर्त्यांना 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटाचा लाभ कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळेल. मात्र असेच जिओ वापरकर्ते 5जी वापरण्यास सक्षम असतील, ज्यांचा स्मार्टफोन 5जी आहे आणि जिओ 5जी सेवेला सपोर्ट करतो.