India Independence Day 2026 Google Doodle: भारताचा स्वातंत्र्यदिन निमित्त गूगलचं रंगीबेरंगी वस्त्रकला-प्रेरित डूडल

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने आपल्या मुखपृष्ठावर एक खास डूडल सादर केले असून, त्यात भारतीय वस्त्रकला आणि पारंपरिक नक्षीकामापासून प्रेरित रंगीबेरंगी रचना दाखवण्यात आली आहे.

India Independence Day 2026 Google Doodle

भारताचा स्वातंत्र्यदिन आज मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गुगलने (Google) आपल्या होमपेजवर एक विशेष डूडल (Doodle) सादर केले आहे. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या या डूडलमध्ये भारतीय वस्त्रकलेपासून प्रेरित रंगीबेरंगी रचना वापरण्यात आली आहे. या डूडलमध्ये गुगलचा नेहमीचा लोगो भारतीय वस्त्रांमधील नक्षीकाम आणि पारंपरिक सजावटीच्या आकृतिबंधांनी सजवलेल्या रंगीत ठिपकेदार रचनेत रूपांतरित करण्यात आला आहे. यामुळे गुगलच्या होमपेजला यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक ठळक भारतीय रूप प्राप्त झाले आहे.

एका व्यक्ती किंवा स्मारकाऐवजी सांस्कृतिक विविधतेवर भर

मागील काही वर्षांतील डूडलमध्ये गुगलने विशिष्ट स्मारके, ऐतिहासिक व्यक्तिरेखा किंवा घटनांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र यंदाच्या डूडलमध्ये असे कोणतेही एक केंद्रबिंदू निवडण्यात आलेले नाही. त्याऐवजी रंगसंगती, हस्तकला-प्रेरित नक्षीकाम आणि गुगलच्या अक्षररचनेचाच वापर करून देशाचे सांस्कृतिक वैविध्य दर्शवण्यात आले आहे.

दरवर्षीची परंपरा कायम

गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून गुगल दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास डूडल सादर करत आले आहे. यापूर्वीच्या वर्षांत पतंगबाजी, पारंपरिक दरवाजे, ट्रक आर्ट आणि भारतीय वस्त्र परंपरा अशा विविध संकल्पनांवर आधारित डूडल तयार करण्यात आले होते. यंदाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तही ही परंपरा कायम राखत गुगलने वस्त्रकलेच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक ओळखीला सलामी दिली आहे.

यंदाचे भारताचा स्वातंत्र्यदिन सोहळा वैशिष्ट्य

यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण तो राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'ला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानेही साजरा करण्यात आला. यामुळे यंदाच्या कार्यक्रमात या राष्ट्रीय गीताला विशेष स्थान देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून देशाला संबोधित केले, तर या सोहळ्यात प्रथमच 'वंदे मातरम'चे सादरीकरण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिन हा भारतीयांसाठी केवळ ऐतिहासिक स्मरणाचा दिवस नसून, देशाच्या भविष्यातील वाटचालीचा संकल्प करण्याचाही दिवस मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातील नागरिकांनी घरांवर, इमारतींवर आणि रस्त्यांवर तिरंगा फडकावून हा दिवस साजरा केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement