TikTok ला टक्कर देण्यासाठी भारतीय Chingari App सज्ज? व्हिडिओ बनवण्यासाठी युजर्सला मिळत आहेत पैसै
चिंगारी या अॅपला एक लाखाहून अधिक युजर्संनी डाऊनलोड आणि सब्सक्राईब केले आहे.
चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उगम झाल्याने चीनची प्रतिमा काहीशी मलिन झाली असून भारत-चीन सीमावाद यामुळे दोन्ही देशात अधिकच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 'मेड इन चायना' (Made in China) प्रॉडक्टवर बहिष्कार टाकण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भारतीय वस्तू प्रमोट करण्याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे चीनी वस्तूंना पर्याय म्हणून देशी बनावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. दरम्यान चीनी अॅप टिक टॉक (Tik Tok) ला सध्या खूप नुकसान सहन करावे लागत आहे. (TikTok ला टक्कर देणारा Mitron App हा मेड इन इंडिया नाही? अॅप चा कोड अवघ्या 2600 रुपयात खरेदी केल्याचा पाकिस्तानी कंपनी कडून दावा)
टिकटॉकला टक्कर देण्यासाठी भारतीय अॅप चिंगारी याचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. चिंगारी या अॅपला एक लाखाहून अधिक युजर्संनी डाऊनलोड आणि सब्सक्राईब केले आहे. हा अॅप मित्रों (Mitron App) या भारतीय अॅपला देखील टक्कर देत आहे. त्यामुळे चिंगारी अॅप टिक टॉकला तोड देईल का? अशी सर्वत्र चर्चा आहे. सध्या चिंगारी अॅप टिक टॉकसाठी एक नवा पर्याय आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन हा अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड केला जात आहे. त्यामुळे चिंगारी अॅपच्या युजर्सचे प्रमाण वाढत आहे.
चिंगारी अॅप एक व्हिडिओ-ऑडिओ बेस्ड फ्री सोशल अॅप आहे. या अॅपद्वारे युजर्सला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होत आहे. तसंच व्हिडिओ बनवण्यासाठी या अॅपद्वारे युजर्सला पैसे दिले जात आहेत. चिंगारी अॅप इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
बिश्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम या दोन बंगळुरु स्थित प्रोग्रॅमरने 2019 मध्ये चिंगारी अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे युजर्स चीनी अॅप टिकटॉक प्रमाणे युजर्सला शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी आणि पोस्ट करण्यासाठी पैसे देत आहे.