Chinese Rocket Falling To Earth: चीनने अंतराळात सोडलेले रॉकेट पुन्हा अनियंत्रित; लवकरच धडकणार पृथ्वीवर, कुठे व कधी विनाश होईल माहित नाही

पृथ्वीच्या वातावरणात येताच त्याचा बराचसा भाग जळून राख होईल. पण काही भाग पृथ्वीवर आदळू शकतो.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित)

Chinese Booster Rocket Falling To Earth: या आठवड्यात चीनचे (China) एक रॉकेट अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. ते कुठे आणि कधी पडेल, हे सध्या खुद्द चीनलाही माहीत नाही. 24 जुलै 2022 रोजी, चीनने अंतराळात लाँग मार्च रॉकेट (Long March 5B Rocket) सोडले, ज्याने चीनच्या स्पेस स्टेशनचा काही भाग अवकाशात नेला. मात्र चीनने आपल्या रॉकेटवरील नियंत्रण गमावले आहे. या आठवड्यात ते पृथ्वीवर धडकू शकते.

तीन वर्षांत चीनचे रॉकेट नियंत्रणाबाहेर जाण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात प्रक्षेपित करण्यात आलेले मार्च सीरिजचे रॉकेट पृथ्वीवर पडले होते. त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2020 मध्ये चीनचे रॉकेट पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरात उतरले होते.

लाँग मार्च रॉकेट हे चीनचे मुख्य रॉकेट आहे, जसे आपल्याकडे इस्रोचे PSLV रॉकेट आहे. चीन स्वतःचे स्पेस स्टेशन बनवत आहे. गेल्या काही वर्षांपासून ते रॉकेटच्या माध्यमातून स्पेस स्टेशनचे काही भाग अवकाशात पाठवत आहेत. नासाचे अंतराळवीर जोनाथन मॅकडॉवेल यांनी चीनच्या रॉकेटबद्दल व्यक्त केलेल्या भीतीनंतर जगभरातील रडार आता या रॉकेटवर लक्ष ठेवून आहेत. (हेही वाचा:  NASA ने प्लुटो ग्रहाचा शेअर केला खास फोटो; नेटिझन्स झाले फोटो पाहून अचंबित!)

या रॉकेटचा वेग आणि सतत बदलणारी उंची यामुळे ते पृथ्वीवर कधी, कोणत्या दिवशी, कुठे पडेल हे कळणे कठीण आहे. पृथ्वीच्या वातावरणात येताच त्याचा बराचसा भाग जळून राख होईल. पण काही भाग पृथ्वीवर आदळू शकतो. लाँग मार्च 5B रॉकेटच्या कोरचे वजन सुमारे 19.6 टन किंवा 17,800 किलो आहे. याआधी 1991 मध्ये 43 टन वजनाचे सोव्हिएत स्पेस स्टेशनचे Salyut-7 (Salyut-7) अनियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर पडले होते, ज्यामुळे अर्जेंटिनात कहर माजला होता.