World Badminton Championship 2022: सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक केले काबिज
सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (World Badminton Championship) कांस्यपदक जिंकले.
सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (World Badminton Championship) कांस्यपदक जिंकले. या जोडीला पुरुष दुहेरी प्रकारात उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय जोडीला मलेशियन जोडी अॅरॉन चिया आणि सोह वोई यिक यांनी तीन गेमच्या सामन्यात पराभूत केले. मलेशियाच्या जोडीने हा सामना 20-22, 21-18, 21-16 असा जिंकला. या चॅम्पियनशिपमधील भारतीय जोडीचे हे पहिलेच पदक आहे. तसेच या चॅम्पियनशिपमधील पुरुष दुहेरी प्रकारातील भारताचे हे पहिले पदक आहे.
मलेशियाच्या जोडीने एक तास 17 मिनिटांत मोठ्या संघर्षानंतर हा सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग जोडीने चुरशीच्या लढतीनंतर पहिला गेम कसा तरी जिंकला, पण मलेशियाच्या जोडीने दुसरा गेम जिंकून सामना तिसऱ्या गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्ये भारतीय जोडी मलेशियाच्या जोडीला मागे टाकू शकली नाही आणि त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार भारतीय पुरुष दुहेरी जोडीला उपांत्यपूर्व फेरीतही कडवी झुंज मिळाली. या जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जपानी जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा पराभव करून आपले पहिले पदक निश्चित केले. हेही वाचा Neeraj Chopra: निरज चोप्राने रचला इतिहास, लुसाने डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय; पहा व्हिडीओ
विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या जोडीने उपांत्य फेरी गाठण्यासाठी एक तास 15 मिनिटे रंगलेल्या सामन्यात गतविजेत्या जपानी जोडीचा 24-22, 15-21, 21-14 असा पराभव केला. याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यामुळे भारतीय जोडी मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेत उतरली.
2011 नंतर भारताने या स्पर्धेत नेहमीच पदके जिंकली आहेत. जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरी प्रकारातील भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने 2011 मध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकूण 13 वे पदक आहे. पीव्ही सिंधूने 2019 मधील सुवर्ण पदकासह या स्पर्धेत एकूण पाच पदके जिंकली आहेत तर सायना नेहवालने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय किदाम्बी श्रीकांतने रौप्य, लक्ष्य सेन, बी साई प्रणीत आणि प्रकाश पदुकोणने कांस्यपदक पटकावले आहे.