प्रो-बॉक्सिंगला भारतात उज्ज्वल भविष्य: मारिओ दसेर

असे केल्यानेच अधिकाधिक चांगले खेळाडू घडतील.

(Photo Credits:YouTUBE)

मुंबई: भारतात प्रो-बॉक्सिंग या खेळाचा चांगला विकास होत आहे. त्यामुळे या खेळाचे भारतातील भविष्य उज्ज्वल आहे, अशी भावना जर्मनीचा प्रो-बॉक्सर मारिओ दसेर याने काढले आहेत. दसेर हा जर्मनीचा असा खेळाडू आहे, जो प्रो-बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात एकदाही पराभूत झाला नाही. एकूण कारकिर्दीत त्याने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. त्यापैकी सर्वच्या सर्व सामने तो जिंकला आहे. दसेर हा काही दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर होता. दरम्यान, त्याने एका मराठी वृत्तपत्रासोबत संवाद साधला. या वेळी त्याने प्रो-बॉक्सिंग या खेळाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारत भविष्यात अव्वल स्थानी

पुढे बोलताना दसेर म्हणाला की, भारतामध्ये विजेंदरसारखे खेळाडू आहे. या खेळाडूंमुळे देशात प्रो-बॉक्सिंगची प्रसिद्धी आणि लोकप्रियता कमालीची वाढत आहे. विशेष असे की, या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या क्रमवारीतही चांगलीच सुधारणा झाल्याचे पहायला मिळते. त्यामुळे हा विकास असाच कायम राहिल्यास प्रो-बॉक्सिंगमध्ये भारत भविष्यात अव्वल स्थान गाठू शकतो, असेही दसेर म्हणाला.

विश्व अजिंक्यपदावर लक्ष्य

दरम्यान, स्वत:ची खेळी आणि लक्ष्य याबाबत बोलताना दसेरने सांगितले की, आजघडीला विश्व अजिंक्यपद हे माझ्यासाठी प्रमुख ध्येय आहे. त्या दृष्टीने माझी जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, मुले आणि पालक यांच्यातील संबंधावरही त्याने भाष्य केले. दसेर म्हणाला, अनेकदा पालक आपल्या आवडीनिवडीच्या क्षेत्रांबाबत मुलांवर सक्ती करतात. पण, असे करणे योग्य नाही. मला वाटते मुलांवर कोणतीही गोष्ट लादू नये. त्याचे नैसर्गिक गुण उमलू द्यावेत. मुलांना जर एखाद्या क्षेत्रात, विषयात विशेष आवड असेल तर, त्याला ते करू द्यावे. असे केल्यानेच अधिकाधिक चांगले खेळाडू घडतील.