WPL 2023 Players Auction: महिला आयपीएलसाठी लिलाव होणार 'या' दिवशी, 409 खेळाडूंवर होणार पैशांचा वर्षाव
या महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन 4 ते 26 मार्च या कालावधीत खेळवला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राच्या लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही स्पर्धा कधी खेळवली जाईल याची तारीखही जाहीर केली आहे. बीसीसीआयने सांगितले की महिला प्रीमियर लीगचा पहिला लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईत (Mumbai) होणार आहे. या महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन 4 ते 26 मार्च या कालावधीत खेळवला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या स्पर्धेत 22 सामने खेळवले जाणार आहेत. सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम (Brabourne Stadium) आणि डीवाय पाटील स्टेडियमवर (D.Y Patil Stadium) होणार आहेत.
बीसीसीआयने सांगितले की पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावासाठी 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 409 महिला खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. यातील 246 खेळाडू भारतीय आहेत, तर 163 महिला खेळाडू परदेशी आहेत. यामध्ये 8 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. (हे देखील वाचा: Women's T20 World Cup 2023: टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 12 फेब्रुवारीला होणार हाय व्होल्टेज सामना, पहा हेड टू हेड आकडेवारीवर)
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावात 202 कॅप्ड महिला खेळाडू असतील. तर 199 खेळाडूंचा समावेश अनकॅप्ड करण्यात आला आहे. पहिल्या महिला प्रीमियर लीग हंगामात एकूण 5 संघ असतील, एकूण 90 स्लॉट रिक्त आहेत. म्हणजेच 409 पैकी फक्त 90 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्येही परदेशी खेळाडूंसाठी जास्तीत जास्त 30 जागा रिक्त राहतील.
50 लाखांच्या श्रेणीतील 11 भारतीय
महिला प्रीमियर लीग साठी पहिल्या लिलावात कमाल आधारभूत किंमत 50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या श्रेणीत 24 खेळाडू ठेवण्यात आले आहेत. या स्लॉटमध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्मा यांच्यासह 11 भारतीय खेळाडूंना या श्रेणीत स्थान मिळाले आहे. तर 13 खेळाडू परदेशी आहेत. याशिवाय 30 खेळाडूंना 40 लाख रुपयांच्या आधारभूत किमतीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. उर्वरित महिला खेळाडू 30 लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार या महिला प्रीमियर लीग लिलाव दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.