Women's Big Bash League 2021: स्मृति मंधानाची WBBL मध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय, नाबाद शतकाने मोडले अनेक विक्रम; पण सामन्याचे चित्र वेगळंच

तिने महिला बीबीएलमध्ये 57 चेंडूत पहिले शतक झळकावले. यासह, या महिला लीगमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. सिडनी थंडरकडून खेळणाऱ्या मंधाना मॅके येथे आपल्या नाबाद शतकी खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले.

स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/@WBBL)

भारताची तडाखेबाज सलामी फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने बुधवारी महिला बिग बॅश लीगमध्ये (Women's Big Bash League) इतिहास रचला. तिने महिला बीबीएलमध्ये  (WBBL) 57 चेंडूत पहिले शतक झळकावले. यासह, या महिला लीगमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. सिडनी थंडरकडून (Sydney Thunders) खेळणाऱ्या मंधाना मॅके येथे मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध (Melbourne Renegades) 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हा पराक्रम केला. तिने आपल्या नाबाद शतकी खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले. स्मृतीने नाबाद 114 धावा केल्या मात्र संघाला विजयीरेष ओलांडून देण्यास अपयशी ठरली. मेलबर्न रेनेगेड्सने हा सामना अवघ्या चार धावांनी जिंकला. सिडनी थंडरला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती, परंतु भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) घातक गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात मंधाना आणि ताहिला विल्सन यांना एकही चौकार ठोकू दिला नाही.

1. स्मृतीच्या नाबाद 114 महिला बिग बॅश लीग (WBBL) मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तिने 2017 पासून अबाधित असलेल्या अ‍ॅशले गार्डनरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

2. WBBL मध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय फलंदाज आहे

3. WBBL शतक झळकावणारी ती सिडनी थंडरची पहिली फलंदाज आहे.

4. स्मृतीची टी-20 मधली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि फॉरमॅटमधील तिचे दुसरे शतक आहे. योगायोगाने, हरमनप्रीत विरोधी संघाचा भाग असताना तिची दोन्ही शतके झाली आहेत.

5. स्मृती मंधानाचा परदेशी T20 लीगमधील सर्वोच्च स्कोअर सिडनी थंडर (आज) विरुद्ध 114 नाबाद आहे, तर तिने KSL मध्ये लंकाशायर थंडर विरुद्ध 102 (2018) धावा केल्या होत्या.

दरम्यान, या पराभवासह थंडर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 64 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 114 धावा केल्याबद्दल मंधानाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्यापूर्वी बोलायचे तर मेलबर्नने 4 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. मेलबर्नसाठी मंधानाची भारतीय सहकारी हरमनप्रीतने 55 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 81 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर गोलंदाजीत तिने 4 षटकात 27 धावा देत 1 विकेट घेतली.