17 वर्षीय नसीम शाह भविष्यात विराट कोहली याला सहज बाद करेल, पाकिस्तानी क्रिकेटपटूचं धाडसी विधान

इक्बाल सोशल मीडियावरील आपल्या धाडसी विधानासाठी ओळखले जातात.

विराट कोहली, नसीम शाह (Photo Credit: Getty)

विराट कोहली (Virat Kohli) सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि कोणत्याही गोलंदाजासाठी त्याची विकेट घेणे मोठे यश आहे. विरोधी संघाचा प्रत्येक गोलंदाज विराटची विकेट घेण्यास उत्सुक असतो कारण त्याचे स्थान जागतिक क्रिकेटमध्ये मोठे आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू फैसल इक्बाल (Faisal Iqbal) यांनी असा दावा केला आहे की पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) निश्चितच आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये विराटला सहज बाद करेल. इक्बाल सोशल मीडियावरील आपल्या धाडसी विधानासाठी ओळखले जातात आणि भविष्यात जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने येतील तेव्हा रन मशीन कोहलीला नसीमच्या बॉलचा सामना करणे कठीण होईल असा त्यांचा विश्वास आहे. 17 वर्षीय नसीमने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तो विराटला गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. PakPassion.net शी बोलताना शाह म्हणाला होता की आपल्या गोलंदाजीची पातळी वाढवण्यासाठी कोहलीसारख्या दिग्गजांना गोलंदाजी करायची आहे. (विराट कोहली आणि भारताविरुद्ध खेळण्यासाठी 17 वर्षीय पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह उत्सुक, म्हणे-'कोहलीविरुद्ध गोलंदाजी करण्याची भीती नाही')

अशा परिस्थितीत फैसल इक्बाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की मला खात्री आहे की भविष्यात नसीम विराट कोहलीला 'बन्नी' बनवेल. नसीमच्या वेगवान गोलंदाजीमुळे विराट चाचपडेल. इक्बाल म्हणाला, "विराट कोहलीचा मी आदर करतो. तो सर्वोत्तम फलंदाज आहे. मला खात्री आहे की आमचा नवीन बॉलिंग स्टार नसीम शाह आपल्या वेगवान गोलंदाजीसह विराट कोहलीला बाद करेल. मी भविष्यातील या लढाईची वाट पाहत आहे."

यापूर्वी, नसीमने एकदा कोहलीला गोलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “होय नक्कीच, भारत-पाकिस्तान हे सामने नेहमीच खास असतात आणि मला अनेकांनी सांगितलं आहे की या सामन्यांमध्ये खेळाडू एकतर हिरो ठरतात किंवा टीकेचे धनी होतात. मलाही भारतविरुद्ध एकदा खेळायचं आहे. भारतविरुद्ध खेळायची संधी मिळाली तर मी चांगली कामगिरी करेन आणि पाकिस्तानी चाहत्यांना निराश होऊ देणार नाही. विराट कोहलीचा फलंदाज म्हणून मी आदर करतो पण मी त्याला घाबरत नाही.”