Bengaluru Stampede Case: बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाळे यांना अंतरिम जामीन मंजूर; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
आरसीबी फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाळे यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) अंतरिम जामीन मंजूर केला.
Bengaluru Stampede Case: आयपीएल (IPL 2025) विजयानंतर बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आलेले आरसीबी फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाळे ( Nikhil Sosale) यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) अंतरिम जामीन मंजूर केला. 4 जून रोजी आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय मोठ्या संख्येने लोक जखमी झाले होते. निखिल सोसाळे यांच्यासह डीएनए एंटरटेनमेंट कंपनीच्या इतर दोन अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली.
ही कंपनी आरसीबीच्या आयपीएल 2025 च्या विजय सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळत होती. न्यायालयाने जामिनाच्या वेळी काही कठोर अटी घातल्या आहेत. सर्व आरोपींना त्यांचे पासपोर्ट जमा करावे लागतील. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सोसाळे यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की कोणतीही चौकशी आणि ठोस पुरावा न देता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेनुसारच ही अटक करण्यात आली आहे.
बेंगळुरू पोलिसांनी दावा केला आहे की, त्यांनी आरसीबीला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जल्लोष साजरा करण्याची परवानगी दिली नाही. असे असूनही, कार्यक्रमस्थळी गर्दी जमली आणि गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 11 जणांचाा मृत्यू झाला. या अपघातानंतर, आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) यांना प्रथम आरोपी म्हणून नाव देण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर, केएससीएचे ई.एस. जयराम आणि सचिव ए. शंकर यांनी 'नैतिक जबाबदारी' स्वीकारून आपल्या पदांचा राजीनामा दिला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

