Champions Trophy 2025: मोहम्मद रिझवानने व्यक्त केली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येण्याची आशा
मात्र टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसत आहे.
Champions Trophy 2025: मोहम्मद रिझवानला नुकतेच पाकिस्तानच्या व्हाईट बॉल संघाचा कर्णधार बनवण्यात आले. स्टार फलंदाज बाबर आझमच्या जागी रिझवानने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. कर्णधार झाल्यानंतर रिझवानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर येण्याची आशा व्यक्त केली. पाकिस्तानचा नवा कर्णधार म्हणाला की, येथील चाहत्यांना भारतीय क्रिकेटपटू आवडतात.
टीम इंडियाने 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषकासाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे भारतीय संघाने पुन्हा पाकिस्तानला भेट दिली नाही. मात्र, 2008 पासून पाकिस्तानचा संघ अनेक वेळा भारत दौऱ्यावर गेला होता. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. (हेही वाचा - Mohammad Rizwan New Captain: पाकिस्तान क्रिकेट संघाने घेतला मोठा निर्णय, रिझवानला बनवले व्हाइट बॉलचा कर्णधार )
टीम इंडियाच्या दौऱ्याची आशा व्यक्त करताना रिझवान म्हणाला की, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. इंटरनॅशनल न्यूजशी बोलताना रिझवान म्हणाला, "येथील चाहत्यांना (पाकिस्तान) भारतीय क्रिकेटपटू आवडतात आणि टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये खेळताना पाहून त्यांना खूप आनंद होईल. जर ते आले तर आम्ही त्यांचे जोरदार स्वागत करू."
चॅम्पियन्स ट्रॉफी कधी खेळली जाईल?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळली जाणार आहे, ज्याचे आयोजन पाकिस्तान करत आहे. मात्र टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसत आहे.
सुरक्षेचा विचार करून भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार नाही. याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नसली तरी, आतापर्यंतच्या मीडिया रिपोर्ट्सवरून असे दिसते आहे की, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. आता या मुद्द्यावर अखेर कोणता अधिकृत निर्णय येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.