On This Day: क्रिस गेलने 7 वर्षांपूर्वी IPL मध्ये ठोकले होते क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक, अजूनही कायम आहे रेकॉर्ड

गेलने 23 एप्रिल 2013 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध अवघ्या 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या ज्यामध्ये 13 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता.

क्रिस गेल (Photo Credits : Twitter)

युनिव्हर्स बॉस नावाने प्रसिद्ध वेस्ट इंडीजचा सलामी फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) याने आजपासून 7 वर्षांपूर्वी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) आजच्या दिवशी स्फोटक डाव खेळला, ज्याचा विक्रम अजूनही कायम आहे. गेलने 23 एप्रिल 2013 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (Royal Challengers Bangalore) पुणे वॉरियर्सविरुद्ध (Pune Warriors India) अवघ्या 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या ज्यामध्ये 13 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता. गेलने अवघ्या 30 चेंडूत टी-20 क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले होते. पुणे वॉरियर्सविरुद्ध गेलने हा कमाल केला. आयपीएलमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही वेस्ट इंडियन फलंदाजाच्या नावावर आहे. गेलने या नाबाद खेळीत 17 षटकार ठोकले आणि आयपीएलच्या एका डावात 17 षटकारांचा विक्रम आजही कोणताही फलंदाज मोडू शकला नाही. गेलच्या या विक्रमी शतकाच्या जोरावर बंगळुरू टीमने आयपीएलमधील सर्वाधिक 263 धावांची धावसंख्या उभारली. केवळ आयपीएलच नाही तर टी -20 इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या देखील आहे. (IPL मध्ये एमएस धोनी म्हातारा म्हणून काढायचा छेड, 2018 फायनलनंतर धोनीने दिलेल्या शर्यतीच्या आव्हानाचा ड्वेन ब्रावोने केला खुलासा)

या खेलसह गेलने ब्रेंडन मॅक्युलमच्या 158 धावांचा विक्रमही मोडला. या सामन्यात पुणे वॉरियर्सचा कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेलच्या तुफानी फलंदाजीसमोर पुणे टीमचे गोलंदाजही हताश झाले. गेलने 10 ओव्हरमध्ये आपले शतक पूर्ण केले. शतकी खेळीत गेलने 11 षटकार आणि 8 चौकार लगावले. यापूर्वी आठव्या षटकात गेलने चार षटकार आणि एका चौकारांसह 28 धावा फटकावल्या. त्याने संपूर्ण डावात 17 षटकार आणि 13 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 265.15 होता.

गेलने या सामन्यात 1 ओव्हरही टाकली आणि 5 धावांवर 2 गडी बाद केले. असे म्हटले जाऊ शकते की गेलचा एक विशेष दिवस होता. शिवाय, आरसीबीसाठी हा सर्वात मोठा विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूने या सामन्यात 5 विकेट गमावून 263 धावा केल्या ज्यानंतर पुणे संघ 9 विकेट्सवर 133 धावाच करू शकला. आरसीबीने हा सामना 130 धावांनी जिंकला.