धोनीला सुरक्षेची गरज नाही, देशावासियांचे संरक्षण करण्यास महेंद्रसिग धोनी समर्थ- लष्कर प्रमुख बिपिन रावत
सैन्य दलात प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने धोनीने हा निर्णय घेतला असून तो काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे.
भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने स्वतःहून दौऱ्यातून माघार घेतली आहे. सैन्य दलात प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने धोनीने हा निर्णय घेतला असून तो काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. मात्र या काळात धोनीची लोकप्रियता, प्रसिद्धी वलय, सेलिब्रेटी असणे लोकं विसरलेले नाहीत. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणावर असेल?, असे प्रश्नही लोकांकडून उपस्थित करण्यात आले. लोकांच्या या प्रश्नावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी जबरदस्त उत्तर दिले आहे.
"धोनीला सुरक्षिततेची गरज असल्याचे आम्हाला वाटत नाही. तो त्याचे रक्षण करण्यास समर्थ असून देशवासियांचे रक्षण करण्यासही तो तप्तर आणि समर्थ आहे. त्याच्यावर सोपवण्यात आलेले कार्य तो नक्कीच जबाबदारीने पार पाडेल," असा विश्वासही लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, "सैन्यदलात भरती झाल्यानंतर प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची हिंमत, धैर्य त्या व्यक्तीत असते. तसंच धोनीने स्वतःचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे तो स्वतः बरोबरच देशवासियांचे संरक्षण नक्कीच करु शकतो."
"धोनी आता 106 टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) आहे. त्यामुळे तो आता अनेकांचे रक्षण करू शकतो. अत्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या बटालियनचा तो एक भाग आहे, त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागणार नाही," असेही रावत म्हणाले.
31 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान महेंद्रसिंग धोनी काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत गस्त घालणार असून 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे.
वर्ल्ड कप 2019 च्या सुरुवातीपासूनच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. धोनीने आता निवृत्त व्हावे असे सांगणारा एक गट तर धोनीच्या बाजूने उभा राहणारा असा एक गट तयार झाला होता. वर्ल्ड कपच्या काळात तर धोनीवर सडकून टीका झाली. मात्र धोनीने कोणत्याही बाजूने आपली प्रतिक्रीया न नोंदवता आपला निर्णय घेतला. (महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर करणार सैन्याद्वारे देशसेवा? धोनीच्या जवळच्या मित्राकडून खास खुलासा)
यापूर्वी निवृत्तीनंतर धोनी भारतीय सैन्यात दाखल होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र धोनीचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.