IPL Auction 2025 Live

IPL 2022: 3 खेळाडू RCB चा पुढील कर्णधार बनण्याच्या शर्यतीत, 7 कोटीत खरेदी केलेला धडाकेबाज फलंदाज आहे प्रबळ दावेदार!

नवीन कर्णधाराच्या शर्यतीत फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय दिनेश कार्तिक देखील उमेदवारांपैकी एक आहेत. ही जबाबदारी ज्या कोणाला मिळेल त्याच्यावर आरसीबीला प्रथम जेतेपद पटकावण्याची जबाबदारी असेल.

ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंचा बहुप्रतिक्षित मेगा लिलाव संपला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) सारखे संघ आगामी आठवड्यात त्यांच्या कर्णधारांच्या नावाची घोषणा करण्यास सज्ज आहेत. दोन वेळा आयपीएल विजेते केकेआरने (KKR) स्टायलिश भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या हाती संघाची काम दिली तर आता पंजाब किंग्स आणि RCB च्या अंतिम निर्णयाची सर्वांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. आयपीएल (IPL) 2021 नंतर आपण कर्णधार पदाची जबाबदारी सोडणार असल्याचे माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) जाहीर केले होते. त्यामुळे आता विराटनंतर या फ्रँचायझीचा कर्णधार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे विशेषतः आयपीएलच्या लिलाव (IPL Auction) प्रक्रियेनंतर. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्सकडे तीन खेळाडू पर्याय म्हणून उपलब्ध आहेत, पण आता असा आणखी एक चेहरा समोर आला आहे जो कर्णधार पदासाठी सज्ज आहे. (KKR New Captain for IPL 2022: श्रेयस अय्यरच्या हाती कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान, लिलावात 12.25 कोटींचा मिळाला भाव)

फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)

त्याच्याकडे भरपूर अनुभव असल्याने, फाफ डु प्लेसिस RCB च्या कर्णधार पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि CSK साठी 100 आयपीएल सामन्यांसह अनुभवाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डु प्लेसिसला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 7 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. आरसीबीने डु प्लेसिसवर इतका पैसा खर्च करणे म्हणजे फ्रँचायझीला त्याच्यात नक्कीच कर्णधार दिसत आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेलला फ्रँचायझीने लिलावापूर्वी 11 कोटी रुपयांत रिटेन केले असून त्याला 14 सामन्यांत पंजाब किंग्जचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याने 50 टक्के विजयी दराने 7 सामने जिंकले. तसेच बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व करण्याचा अनुभव असलेल्या मॅक्सवेलला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान निश्चित असून, त्याला ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता देखील अधिक आहे. गेल्या वर्षी मोसमात तो आरसीबीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार कार्तिकचा देखील आरसीबीकडे पर्याय आहे. यष्टिरक्षक-फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूचे नेतृत्वही केले आहे आणि अनेकदा तो आपल्या राज्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना दिसतो. तथापि कार्तिक त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर आयपीएल संघाचे नेतृत्व करण्यास इच्छुक आहे? की त्याला नेतृत्वाच्या ओझ्याशिवाय खेळायचे आहे हे पाहणे मनोरंजक असेल.