IPL 2021: RCB ने रिटेन करत AB de Villiers 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करणारा बनला पहिला विदेशी क्रिकेटर, टॉप-3 मध्ये भारतीयांचे अधिराज्य
यासह दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आता एका खास आयपीएल क्लबमध्ये म्हणजेच 100 कोटी पगार असलेल्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
AB de Villiers Joins 100 Cr Salary Club: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी सीझन 14 साठी आपला स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सशी (AB de Villiers) केलेला करार कायम ठेवला. यासह दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आता एका खास आयपीएल (IPL) क्लबमध्ये म्हणजेच 100 कोटी पगार असलेल्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सने आपले सातत्य कायम ठेवले आहे आणि यामुळेच त्याचा सध्याचा आयपीएल संघ आरसीबीने (RCB) त्याच्यावर कोट्यवधी डॉलर्स उधळण्यास मागेपुढे पाहिले नाही. 2021 आयपीएल हंगामापूर्वी आरसीबीने 36 वर्षीय डिव्हिलिअर्सला 11 कोटींमध्ये रिटेन केले आणि इतिहास रचला. डिव्हिलिअर्स आता आयपीएलमधून 100 कोटी पगार म्हणून कमाई करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला. या पराक्रमासह एबी डिव्हिलियर्स आतापर्यंत 100 कोटींचा आकडा पार करणार्या अन्य तीन भारतीय क्रिकेटपटूंच्य क्लबमध्ये सामील झाला आहे. (IPL 2021 Auction मध्ये एमएस धोनी होणार मालामाल, CSK कर्णधार 150 कोटींची कमाई करणारा ठरणार पहिला खेळाडू; विराट कोहली, रोहित शर्मा राहणार मागे)
आयपीएलमध्ये 100 कोटींच्या कमाईचा टप्पा आजवर फक्त तीन खेळाडूंनी पार केला असून हे तीनही भारतीय आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी, मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा आणि डिव्हिलिअर्सचा आरसीबी सहकारी विराट कोहली यांनी यापूर्वी एलिट यादीत प्रवेश केला होता व आता डिव्हिलिअर्सचाही समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पॉवर हिटरने भारताच्या प्रसिद्ध लीगमध्ये एकूण 169 सामने खेळले आहेत आणि 40.40 च्या सरासरीने तब्बल 4849 धावा ठोकल्या आहेत. 'मिस्टर 360' म्हणून प्रसिद्ध हा स्टार खेळाडू सुरुवातीपासूनच टी-20 लीगचा एक भाग आहे. डिव्हिलिअर्सने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून 2008 मध्ये केली ज्यांनंतर 2011 त्याला आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केले.
इंडियन प्रीमियर लीग व्यतिरिक्त डिव्हिलिअर्स अनेक जागतिक फ्रेंचायझी आधारित टी-20 स्पर्धांमध्येही खेळतो आणि त्यासाठी त्याला चांगली रक्कम दिली जाते. डिव्हिलियर्सला त्याच्या अॅन्डोर्समेंट डीलमधून पैसे मिळतात. ऑडी, प्यूमा, मॉन्ट ब्लँक आणि एमआरएफ यासारख्या इतर ब्रांड्सचा तो मुख्य चेहरा आहे.