IPL 2020 Update: आयपीएल आयोजित करण्याच्या शर्यतीत UAE आघाडीवर; 35 ते 40 दिवसांची होऊ शकते लीग, वाचा सविस्तर

शुक्रवारी टेलिकॉन्फरन्सद्वारे आयोजित बीसीसीआय अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीनंतर हे अपडेट समोर आले आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकल्यास आणि कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे यंदा इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) भारतात आयोजन न झाल्यास दुसऱ्या देशात लीगचे आयोजन करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यंदा युएईला (UAE) जवळजवळ निश्चित केले आहे. शुक्रवारी टेलिकॉन्फरन्सद्वारे आयोजित बीसीसीआय अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीनंतर हे अपडेट समोर आले आहे. 2014 मध्ये आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करणारे युएई आयपीएल आयोजित करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यापूर्वी श्रीलंकाने देखील आयपीएल आयोजित करण्यामध्ये रुची दाखवली होती. कोविड-19 मुळे एप्रिल ते मे महिन्याची मुदत चुकल्यानंतर आयपीएल पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आले होते. तथापि, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयसीसीने टी-20 विश्वचषक (T20 World Cup) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यास बोर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक असल्याचे यापूर्वी म्हटले होते. (IPL 2020 Update: ICCच्या पुढील बैठकीत होऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय, आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता)

दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत सदस्यांनी आयपीएलचे वेळापत्रक कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. यावर्षी 5 ते 6 आठवड्यांमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या विंडोमध्ये ही स्पर्धा खेळवण्याबाबत बोर्ड विचार करीत आहे. मात्र, यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक रद्द झाल्यावरच हे शक्य होईल. 2014 मध्ये आयपीएलमध्येही खेळल्या गेल्याने आयपीएल होस्टिंग शर्यतीत युएई आघाडीवर आहे. सप्टेंबर-नोव्हेंबर विंडोमध्ये लीग आयोजित केल्यास क्वारंटाइन कालावधीही कमी असेल. वैद्यकीय सुविधेव्यतिरिक्त 6 वर्षांपूर्वी आयपीएलच्या प्रथम होस्टिंगचा अनुभवही युएईच्या बाजूने पाहिला जात आहे.

आतापर्यंत दोनदा लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलला भारताबाहेर खेळले गेले आहे. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. तेव्हा आयपीएल 5 आठवडे आणि 2 दिवस चालला. 2014 मध्ये या स्पर्धेचे सामने भारताव्यतिरिक्त युएईमध्ये खेळले गेले होते. दुसरीकडे, अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत टीम इंडियाच्या प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यावरही चर्चा झाली. प्रशिक्षण शिबिरासाठी धर्मशाळा, अहमदाबादच्या नावाची चर्चा झाली. अहमदाबादमध्ये नव्याने बांधलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये जैव-सुरक्षित वातावरणात शिबिर आयोजित केले जाऊ शकते.