IPL 2020 Sponsorship: आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून चिनी मोबाइल कंपनी VIVO चा करार यंदासाठी स्थगित, BCCI कडून अधिकृत घोषणा

बीसीसीआयने एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आणि चिनी स्मार्टफोन निर्माता विवो कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनीच्या भारतीय शाखा विवो इंडियाने (VIVO India) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2020 मोसमातील भागीदारी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली. “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि विवो मोबाइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 2020 मध्ये इंडियन प्रीमियर लीगसाठीची आपली भागीदारी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,” प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 वा हंगाम यंदा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुरू होईल आणि युएईमध्ये (UAE) खेळला जाईल. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) शारजाह, अबू धाबी आणि दुबई येथे तीन ठिकाणी खेळली जाईल.  बीसीसीआय आणि विवोमधील 5 वर्षांचा हा करार दोन वर्षानंतर खंडित झाला आहे. (IPL 2020 SOP: वेगळ्या हॉटेलांमध्ये राहणार फ्रेंचायझी, बायो-बबलचे उल्लंघन केल्यास शिक्षा; BCCIच्या आरोग्य व सुरक्षा प्रोटोकॉलची संपूर्ण माहिती जाणून घ्या)

पूर्व लडाखमध्ये भारत-चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या दरम्यान, भारतीय लोकांनी सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात करण्यात आली. सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, चिनी गुंतवणूकींवर कडक निर्बंध लावले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा बीसीसीआयने आयपीएलच्या 13 व्या सीझनची घोषणा केली आणि VIVO यंदा आयपीएलचा मुख्य प्रायोजक असेल असे सांगितले तेव्हा क्रिकेट चाहते संतापले होते. बीसीसीआयच्या या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय चाहत्यांनी बॉयकॉट आयपीएल, सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू केला, ज्याच्यासमोर बीसीसीआयला गुढघे टेकावे लागले आणि त्याने विवोबरोबरचा करार किमान या वर्षासाठी स्थगित केला आहे.

दुसरीकडे, VIVO आणि बीसीसीआयने हा करार एका वर्षासाठी कोणत्या कारणाने पुढे ढकलला याबाबत भारतीय बोर्डाने अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, बीसीसीआय यावर्षी लीगसाठी नवीन मुख्य प्रायोजकांना आमंत्रित करण्यासाठी निविदा काढण्याची योजना आहे.