IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा फटका! केन विल्यमसन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतूनही बाहेर

न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे की, इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विल्यमसनचा फिटनेस सुनिश्चित करण्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

Kane Williamson (Photo Credit - X)

IND vs NZ: कंबरेच्या दुखापतीने त्रस्त असलेला केन विल्यमसन (Kane Williamson) भारताविरुद्ध 1 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत(IND vs NZ) खेळणार नाही. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने म्हटले आहे की इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विल्यमसनचा फिटनेस सुनिश्चित करण्यासाठी किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीसाठी भारतात जाणार नाही.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांना म्हटले केले की, 'केनच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे, परंतु तो सध्या आमच्यासोबत येण्यास पूर्णपणे तयार नाही. त्यामुळे आम्हाला वाटते की त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तयार राहण्यासाठी सध्या न्यूझीलंडमध्ये त्याचे उपचार सुरू ठेवावे जेणेकरून तो परत खेळू शकेल.'  (हेही वाचा: IND vs NZ 3rd Test, Wankhede Stadium Stats And Pitch Report: वानखेडे स्टेडियमवर रंगणार टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना; खेळपट्टीचा अहवाल, रेकॉर्ड, सर्वाधिक धावा, विकेट्सची आकडेवारी घ्या जाणून)

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 28 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरुवात होणार आहे. श्रीलंका दौऱ्यात विल्यमसनला ही दुखापत झाली होती, त्यामुळे विल्यमसन भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा भाग होऊ शकला नाही.

मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका न्यूझीलंडने आधीच जिंकली आहे. न्यूझीलंड सध्या 2-0 ने आघाडीवर आहे आणि न्यूझीलंडचा हा भारतातील पहिला कसोटी मालिका विजय आहे. भारताने 12 वर्षांत प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे.