Guru Purnima 2020: गुरु पौर्णिमा दिनी सचिन तेंडुलकर ने शेअर केला खास व्हिडीओ; मानले 'या' तीन गुरूंचे आभार (Watch Video)
यामध्ये सचिनने आपल्या आयुष्यतील तीन मुख्य गुरु म्हणजेच आपला भाऊ अजित तेंडुलकर (Ajit Tendulkar), आपले कोच रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) आणि वडील रमेश तेंडुलकर (Ramesh Tendulkar) यांचा उल्लेख केला आहे.
Guru Purnima Wishes: आज, 5 जुलै रोजी गुरु पौर्णिमा (Guru Purnima) सण साजरा केला जात आहे, कोरोनामुळे (Coronavirus) यंदा प्रत्यक्ष भेट शक्य नसली तरी प्रत्येकजण आपापल्या गुरूला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे त्यांचे आभार मानत आहे. काही वेळापूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने सुद्धा आपल्याला घडवणाऱ्या सर्व गुरूंचे आभार मानत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सचिनने आपल्या आयुष्यतील तीन मुख्य गुरु म्हणजेच आपला भाऊ अजित तेंडुलकर (Ajit Tendulkar), आपले कोच रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) आणि वडील रमेश तेंडुलकर (Ramesh Tendulkar) यांचा उल्लेख केला आहे. एकाने क्रिकेट मध्ये जाण्याचे, एकाने क्रिकेट शिकवण्याचे आणि एकाने जीवन जगण्याचे धडे दिले आहेत. यासाठी त्या तिघांनाही धन्यवाद म्हणताना सचिनने व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजात हातात बॅट घेऊन सचिन बोलताना पाहायला मिळतोय.
सचिन ने आज या व्हिडीओ मध्ये म्हंटले आहे की, "मी जेव्हा जेव्हा बॅट हातात घेतो मी तीन लोकांची आठवण काढल्याशिवाय राहू शकत नाही. सर्वात पहिला गुरु म्हणजे माझा भाऊ, ज्याने मला क्रिकेट मध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिले, जेव्हा मी बॅटिंगला जायचो तेव्हा माझा भाऊ प्रत्यक्ष जरी सोबत नसला तरी नेहमी तो माझ्यासोबत मैदानात येतोय असा विश्वास असायचा. माझे दुसरे गुरु म्हणजे रमाकांत आचरेकर सर, त्यांच्या बद्दल तर बोलण्यासाठी शब्द कमी पडतील, त्यांनी तासंतास माझ्या बॅटिंगचे नोट्स काढण्यापासून ते शॉट्स शिकवण्यापर्यंत सगळं काही केलंय, आणि माझे तिसरे गुरु म्हणजे माझे बाबा, ज्यांनी मला शॉर्टकट न घेण्याची शिकवण दिली. मूल्य शिकवली. या व माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाने मला काही ना काही शिकवले आहे, त्या सर्वांना आज गुरु पौर्णिमेच्या निमित्त खूप धन्यवाद".
सचिन तेंडुलकर व्हिडीओ
असं म्हणतात की, कोणत्याही महान व्यक्तिपाठी त्याला घडवणाऱ्या गुरूचा सर्वात मोठा हात असतो. त्याच्या परिश्रमाला वळण देणाऱ्या, दिशा दाखवणाऱ्या गुरूमुळेच यश प्राप्त झालेले असते. तुमच्याही आयुष्यात असे व्यक्ती असतील,त्या सर्वांना धन्यवाद म्हणण्याचा हा दिवस आहे, ही संधी दवडू नका.