IND vs SL 3rd ODI: तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात रोहित शर्मा घेऊ शकतो कठोर निर्णय, मधल्या फळीत होऊ शकतो बदल
भारतानं तिसरी वनडे जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे उद्या कोलंबोमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिली मॅच टाय झाल होती. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव झाला होता. तिसरा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाला तिसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. तर मालिकेवर कब्जा करण्यासाठी श्रीलंकेचे लक्ष असेल. (हेही वाचा - IND vs SL 3rd ODI 2024 Live Streaming: तिसऱ्या वनडेत श्रीलंकेला हरवून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्याचा करणार प्रयत्न, जाणून घ्या, केव्हा, कुठे आणि कसे पाहू शकता थेट प्रक्षेपण)
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी लढावं लागणार आहे. भारतानं तिसरी वनडे जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटणार आहे. रोहित शर्मापुढं भारताच्या मधल्या फळीच्या कामगिरीची चिंता आहे. भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं विकेट गमावत आहेत. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. दोन्ही मॅचमध्ये भारतीय संघानं 10 विकेट गमावल्या. त्यातील एक विकेट वेगवान गोलंदाजानं तर एक विकेट धावबाद झाल्यानं गेली होती. दोन्ही मॅचमध्ये एकूण 18 विकेट भारतानं फिरकी पुढं गमावल्या होत्या.
तिसरी वनडे जिंकायची असल्यास काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामध्ये पहिला भारताच्या फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरं म्हणजे भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. रोहित शर्मा तिसऱ्या मॅचसाठी टी 20 मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रियान परागला शिवम दुबेच्या जागी संधी देऊ शकतो. त्यामुळं शिवम दुबेचं संघातील स्थान सध्या धोक्यात आहे.