Arjun Tendulkar and Saaniya Chandhok Age Difference:अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या वयात किती अंतर? सचिन-अंजलीच्या 'या' योगायोगाची सोशल मीडियावर चर्चा
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच, त्यांच्या वयातील अंतराचा एक मनोरंजक योगायोग समोर आला आहे. अर्जुनपेक्षा सानिया वयाने मोठी असून, हे चित्र सचिन आणि अंजली तेंडुलकर यांच्या जोडीची आठवण करून देणारे आहे.
भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अर्जुन आणि त्याची मंगेतर सानिया चंडोक यांच्या लग्नाची तारीख जवळ येत असतानाच, त्यांच्या वयातील अंतराबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, अर्जुन आणि सानिया यांच्या वयातील हे अंतर त्याचे वडील सचिन आणि आई अंजली यांच्या नात्यातील एका खास योगायोगाची आठवण करून देणारे ठरले आहे.
अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक वयातील अंतर आणि योगायोग
अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला असून सध्या त्याचे वय २६ वर्षे आहे. तर त्याची होणारी पत्नी सानिया चंडोक हिचा जन्म २३ जून १९९८ रोजी झाला असून ती २७ वर्षांची आहे. म्हणजेच सानिया अर्जुनपेक्षा जवळपास १५ महिने (सव्वा वर्ष) मोठी आहे.
हाच तो योगायोग आहे जो सचिन आणि अंजली तेंडुलकर यांच्या बाबतीतही दिसून आला होता. अंजली तेंडुलकर या सचिनपेक्षा वयाने ६ वर्षांनी मोठ्या आहेत. आता अर्जुननेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वयाने मोठ्या असलेल्या जोडीदाराची निवड केल्याने चाहत्यांमध्ये याचीच चर्चा रंगली आहे.
कोण आहे सानिया चंडोक?
सानिया चंडोक ही मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती 'ग्रॅव्हिस ग्रुप'चे अध्यक्ष रवी घाई यांची नात आहे. सानिया स्वतः एक उद्योजिका असून ती मुंबईत प्राण्यांसाठी 'मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर' (Mr. Paws Pet Spa) नावाची संस्था चालवते. तिने 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून शिक्षण पूर्ण केले आहे. सानिया आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर यांच्यात जुनी मैत्री असून, याच मैत्रीचे रूपांतर आता नात्यात होत आहे.
अर्जुन- सानिया चंडोक लग्नाची तारीख आणि तयारी
अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा ऑगस्ट २०२५ मध्ये पार पडला होता. आता प्राप्त माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी हे जोडपे मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहे. ३ मार्चपासून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होईल. हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक स्वरूपाचा असणार आहे, ज्यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहतील.
अर्जुनसाठी २०२६ वर्ष महत्त्वाचे
वैयक्तिक आयुष्यासोबतच अर्जुनसाठी हे वर्ष व्यावसायिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून 'लखनौ सुपर जायंट्स' (LSG) संघात ट्रेड करण्यात आले आहे. लग्नानंतर तो लगेचच आयपीएलच्या मैदानात लखनौच्या संघातून आपली नवी खेळी सुरू करताना दिसेल.
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2026 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

