Aman Sehrawatने कांस्यपदक सामन्यापूर्वी अवघ्या 10 तासांत घटवलं 4.6 किलो वजन, काय केलं नेमकं?
पुरुषांच्या 57 किलोग्रॅममधील मर्यादेपेक्षा अगदी 4.5 किलोग्रॅम वजन जास्त होते. त्यानंतर निरनिराळे व्यायाम, हॉट-बाथ, सॉना बाथ यांचा वापर करून त्याचे वजन कमी करण्यात आले.
Aman Sehrawat Diet: भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत (Aman Sehrawat) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मेहनतीच्या जोरावर फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात प्युटर्टो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझ याला पराभूत केलं. अमनने त्याला 13-5 अशा फरकाने पराभूत करत कांस्यपदक आपल्या नावावर केले. त्याच्या या कामगिरीमुळे अमन भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता बनला आहे. पण त्यासाठी अमनने घेतलेली मेहनत सध्या चर्चेत आहे. सामन्यासाठी अवघे 10 तास शिल्लक असताना अमनने 4.5 किलो वजन कमी करत भारताची मान उंचवणारी कामगिरी केली. (हेही वाचा:Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पैलवान अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव )
गुरुवारी उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन सेहरावतचे वजन 61.5 किलोग्रॅम पर्यंत पोहोचले होते. पुरुषांच्या 57 किलोग्रॅममधील मर्यादेपेक्षा अगदी 4.5 किलोग्रॅम वजन जास्त आहे. पण पुढच्या 10 तासांत त्याने त्याच्या प्रशिक्षकांसह अथक परिश्रम करून 4.6 किलो वजन कमी केलं. कसे ते जाणून घेऊयात?
जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया या वरिष्ठ प्रशिक्षकांनी अमनचे वजन कमी करणे हे एक 'मिशन' म्हणून स्वीकारले होते. विनेश फोगटसोबत घडलेल्या घटनेची पुनर्रावृत्ती नको म्हणून टीममधील सर्वांनीच ती काळजी घेतली. त्यामुळे 21 वर्षीय अमनने वजनाच्या बाबतीत विशेष काळजी घेतली. त्याला निरनिराळे व्यायाम,हॉट-बाथ,सॉना बाथ करावे लागले.
असे होते 'ते' 10 तास
- 'मिशन'ची सुरुवात दीड तासाच्या मॅट सत्राने झाली.
- त्यानंतर दोन वरिष्ठ प्रशिक्षकांनी त्याला कुस्तीमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर एक तासाचे हॉट-बाथ सत्र झाले.
- 12:30 वाजता अमन जीममध्ये गेला. जिथे अमन ट्रेडमिलवर एक तास न थांबता धावला.
- भरपूर घाम आल्याने वजन कमी करण्यास मदत झाली.
- त्यानंतर अमनला 30 मिनिटांचा ब्रेक देण्यात आला, त्यानंतर 5 मिनिटांच्या सॉना बाथची पाच सत्रे झाली.
- शेवटच्या सत्राच्या शेवटी, अमनचे वजन 900 ग्रॅम जास्त होते. त्याला मसाज देण्यात आला आणि त्यानंतर हलके जॉगिंग करण्यास सांगितले.
- त्यानंतर 15 मिनिटांची पाच सत्रे झाली. पहाटे 4:30 पर्यंत, अमनचे वजन 56.9 किलो - 100 ग्रॅम कमी होते. प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
- यानंतर अमनला कोमट पाण्यात लिंबू आणि मध आणि थोडी कॉफी प्यायला देण्यात आली.
- त्यानंतर अमन झोपला नाही. 'रात्रभर कुस्तीचे व्हिडिओ पाहिले', असं अमनने सांगितले.
अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पहिले पदक जिंकले होते. यापूर्वी विनेश फोगटने अंतिम फेरी गाठली होती, मात्र अवघ्या 100 ग्रॅम वजणामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे तिच्या हातून पदक निसटले.