Fact Check: पीएम नरेंद्र मोदी यांनी दिली बागेश्वर धामला भेट? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
या व्हिडिओच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी मंदिरात बसलेल्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे संस्थापक श्याम मानव यांनी 8 जानेवारी रोजी नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यात म्हटले होते की, नागपुरात 5 ते 13 जानेवारी दरम्यान झालेल्या ‘श्री राम कथे’त धीरेंद्र यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले. मात्र नागपूर पोलिसांनी याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे.
आता पीएम नरेंद्र मोदी बागेश्वर धामला गेले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक लोक एक व्हिडिओ शेअर करत आहेत, म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बागेश्वर धामला गेले होते. साधारण 19 मिनिटे 17 सेकंदांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी मंदिरात बसलेल्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. त्यानंतर व्हिडीओमधील एका व्हॉईस-ओव्हरमध्ये म्हटले आहे की, ‘बागेश्वर धामला अनेक नेते मंडळी भेट देत आहेत. आता यामध्ये पंतप्रधानांच्या नावाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पीएम मोदी यांनी बागेश्वर धामला भेट दिली.’
आता या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की, पीएम नरेंद्र मोदींचा हा व्हिडिओ 2022 मध्ये गुजरातमधील मोधेश्वरी माता मंदिराच्या भेटीचा आहे. बागेश्वर धामचे जनसंपर्क अधिकारी कमल अवस्थी यांनी देखील सांगितले की, पीएम मोदी यांनी बागेश्वर धामला कधीच भेट दिली नव्हती. त्यामुळे हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ संपादित आहे.