Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज पाणीपुरवठा राहणार विस्कळीत; पहा कुठे असेल 100% पाणी कपात

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये काल रात्री पिसे येथील उदंचन केंद्रात आग लागल्यानंतर आज पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. या आगीमुळे जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा आज विस्कळीत राहणार आहे. काही ठिकाणी 100% तर काही ठिकाणी 30% पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई मध्ये आज टी विभाग (पूर्व आणि पश्चिम), एस विभाग (नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, विक्रोळी पूर्व), एन विभाग (विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व, सर्वोदय नगर, नारायण नगर), एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभाग, एफ दक्षिण व एफ उत्तर संपूर्ण विभाग, भंडारवाडा जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ई, बी आणि ए विभाग मध्ये 100% पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे तर उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभाग मध्ये 30% पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही .

पहा ट्वीट

मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील 24 तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर काही प्रमाणात पडेल. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईवर पाणी संकट घोंघावत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये पाणी पुरवठा फेब्रुवारी महिन्यातच 50% च्या खाली गेल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकचा पाणी पुरवठा न झाल्यास बीएमसीने महिना अखेरीपासून पाणी कपातीचे संकट सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)