Balasaheb Thackeray In Movie: स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा; राज ठाकरे यांनी 'हे' कारण देत केली मागणी

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, अशी मागणी केली आहे. आता राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे चित्रपटाशी कसे नाते होते, याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे.

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

Balasaheb Thackeray In Movie: केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, अशी मागणी केली आहे. आता राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे चित्रपटाशी कसे नाते होते, याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे. बाळासाहेबांनी 'मिस्टर आणि मिसेस ५५' ह्या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात भूमिका होती.

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी कधी चित्रपटात काम केलं होतं का? तर त्याचं उत्तर 'हो' आहे... #भारतरत्न_बाळासाहेब_ठाकरे

ठाकरे घराण्याचं आणि कलावंतांचं नातं काल-परवाचं नाही तर ते गेल्या ४ पिढ्यांचं आहे. आचार्य अत्रे ह्यांच्या आग्रहास्तव प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी प्रथम 'राष्ट्रीय पुरस्कार' विजेत्या 'श्यामची आई' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता हा किस्सा सर्वश्रुत आहेच परंतु बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे, हे तितकंसं कुणाला ज्ञात नाही. मार्मिक सुरु होण्यापूर्वी बाळासाहेब व्यंगचित्रांशिवाय बोधचिन्ह, चित्रचिन्ह, चित्रपटाचे पोस्टर्स, जाहिराती असं सर्व काही काम करायचे. बड्या चित्रपट निर्मिती संस्थांची बोधचिन्हही त्यांनी घडवली होती. तेव्हांचच एक लक्षवेधी काम म्हणजे चित्रपटात झळकणं... हो, गुरुदत्त ह्यांनी दिग्दर्शित केलेला आणि मुख्य भूमिका साकारलेल्या चित्रपटात बाळासाहेबांनी शब्दशः हातभार लावला होता.

'मिस्टर आणि मिसेस ५५' ह्या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नायक गुरुदत्त ह्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका वठवली आहे. चित्रपटात कुठे ना कुठे गुरुदत्त त्यांना व्यंगचित्र काढताना दाखवणं क्रमप्राप्त होतं. म्हणून चित्रपटातील एका प्रसंगात गुरुदत्त व्यंगचित्र रेखाटताना दाखवले आहेत. त्या फ्रेममध्ये चित्र रेखाटताना गुरुदत्त ह्यांचा क्लोजअप आहे पण जेव्हा कॅमेरा चित्राकडे वळतो तेव्हा जो रेखाटतानाचा हात आहे तो २९ वर्षीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्या चित्रातील फटकारे, शैली पाहिल्यानंतर तुम्हालाही हे जाणवेल. त्यातली रेषा आणि शैली बाळासाहेबांचीच आहे. आता ह्याला कर्मधर्मसहयोग म्हणा किंवा अजून काही पण चित्रपटात नायकाने ते व्यंगचित्र एका आडमुठ्या व्यक्तीविरोधात काढलं होतं आणि ते वृत्तपत्रात प्रकाशित झालं होतं. त्यानंतर ज्या प्रवृत्तीविरोधात चित्र काढलं त्यांचा तिळपापड होणं स्वाभाविक होतं. हेच बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्रकार आणि नेता म्हणून राजकारण्यांच्याबाबतीत केलं.

मात्र, त्यात एक गोष्ट सर्वांच्याच कल्पनेपलीकडली झाली ती म्हणजे एक व्यंगचित्रकार चित्रांच्या माध्यमातून जनमानस चेतवतो, त्यांचं रूपांतर संघटनेत होतं, अनेक सामान्य घरातील माणसं सत्तेच्या पदापर्यंत पोहोचतात आणि स्वतःच्या संघटनेची राज्यावर सत्ता येते. व्यंगचित्रकार ते राज्यकर्ता हा प्रवास इतका विलक्षण आहे की नंतर 'बाळासाहेब ठाकरे' हे व्यक्तिमत्त्वच चित्रपटाचा विषय बनतं. चित्रपटसृष्टीतलं एक असंही वर्तुळ बाळासाहेबांनी पूर्ण केलं होतं हे विशेष.

अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा !

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now