Pandharpur Wari Dates 2026: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचा निर्णय 13 मे रोजी होणार; आषाढी वारीच्या नियोजनाकडे वारकऱ्यांचे लक्ष
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणांबाबत आणि वेळापत्रकाबाबतचा अंतिम निर्णय १३ मे रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.
आषाढी वारी 2026 च्या पूर्वतयारीला आता वेग आला असून, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आणि मुक्कामाच्या ठिकाणांबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय येत्या 13 मे रोजी घेतला जाणार आहे. आळंदी देवस्थान आणि पालखी सोहळा समितीच्या वतीने आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. यंदाच्या वारीत पालखीचा मार्ग, विसावा आणि मुक्कामाच्या नियोजनात काही बदल होणार का, याकडे राज्यातील लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर वारीच्या तारखा 2026
संत तुकाराम महाराज पालखी (देहू): 7 जुलै 2026 रोजी देहू येथून प्रस्थान होईल.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी): 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथून प्रस्थान होईल.
आषाढी एकादशी (मुख्य दिवस): 25 जुलै 2026.
वेळापत्रकासाठी विशेष बैठक
पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. या प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपूरपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक दिवसाचे नियोजन या बैठकीत निश्चित केले जाते. पालखी मार्गावरील सोयीसुविधा आणि पालखी तळांची सद्यस्थिती लक्षात घेऊन मुक्कामाचे निर्णय घेतले जातात.