SIR अंतर्गत मतदार पुनरीक्षण अर्ज भरल्यास 16 हजार रुपये मिळण्याचा दावा पूर्णपणे खोटा
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ अंतर्गत अर्ज भरणाऱ्या नागरिकांना सरकार किंवा निवडणूक आयोगाकडून १६ हजार रुपये दिले जात असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर सध्या एक संदेश मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ मोहिमेत सहभागी होऊन फॉर्म भरल्यास प्रत्येकाला १६ हजार रुपये मिळतील असा दावा केला जात आहे. अनेक युजर्स या मेसेजसोबत दिलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करून अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अधिकृत माहितीनुसार हा दावा पूर्णपणे बनावट असून अशी कोणतीही आर्थिक योजनेची तरतूद यात नाही.
निवडणूक आयोगाकडून कोणतीही रक्कम दिली जात नाही
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी 'एसआयआर' मोहीम ही केवळ मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरणासाठी आहे. या मोहिमेअंतर्गत घरपोच येणारे बीएलओ (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) किंवा ऑनलाइन स्वरूपात सादर करावयाचे फॉर्म हे मतदारांची नावे, पत्ता आणि इतर माहितीची पडताळणी करण्यासाठी असतात. या कायदेशीर प्रक्रियेसाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा निधी, अनुदान किंवा आर्थिक मोबदला देण्याची कोणतीही योजना अस्तित्वात नाही.