Driving Rule: अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास पालकांना होणार शिक्षा; 25,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद, पोलिसांनी दिला इशारा
पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, अल्पवयीन मुलांनी कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे यावर जोर दिला.
Driving Rule: नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी अल्पवयीन मुलांद्वारे वाहने चालवण्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना आढळल्यास, त्याचे पालक आणि वाहन मालकावर गुन्हा दाखल केला जाईल. गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाने 18 वर्षांखालील व्यक्तींनी दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविण्याबाबत पालकांना सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंतचा दंड, अल्पवयीन चालकाच्या पालकांवर कायदेशीर कारवाई, 12 महिन्यांसाठी वाहन नोंदणी रद्द आणि अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवाना न मिळणे अशी शिक्षा होऊ शकते. नोएडा पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, अल्पवयीन मुलांनी कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे यावर जोर दिला. ‘कोणत्याही पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये,’ असे निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा: UP Paper Leak Case: पेपर लीक प्रकरणी उत्तर प्रदेशच्या 2 आमदारांसह 18 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी)