लखनऊ मध्ये तरुणीची पोस्टरबाजी; 'Siddhi Hates Shiva' च्या पोस्टर्सची सर्वत्र चर्चा
व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वत्र प्रेमाचा बहार आलेला पाहायला मिळतो. मात्र लखनऊमधील गोमतीनगर चौकामधील पोस्टर काहीसं वेगळंच सूचवत आहे.
फेब्रुवारी महिना हा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साठी ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वत्र प्रेमाचा बहार आलेला पाहायला मिळतो. मात्र लखनऊ (Lucknow) मधील गोमतीनगर चौकामधील पोस्टर काहीसं वेगळंच सूचवत आहे. 'सिद्धी हेट्स शिवा' (Siddhi Hates Shiva) असे या पोस्टरवर लिहण्यात आले असून शहरात जवळपास 5-6 ठिकाणी हे मोठाले होर्डिंग्स दिसत आहेत. या पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधले असून प्रेमात धोका मिळाल्याने हे पोस्टर्स (Posters) लावण्यात आले असावे, अशी सर्वत्र चर्चा आहे.
तसंच प्रेमात धोका मिळाल्याने प्रियकराला बदनाम करण्यासाठी हे पोस्टर्स लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र यामागील नेमके कारण, हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. यापूर्वी पुणे शहरातील पिंपळे सौदागर परिसरात एका तरुणाने अशी पोस्टरबाजी केली होती. 'shivade i am sorry’ असे तब्बल 300 पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सची देखील सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यानंतर या नव्या सिद्धी हेट्स शिवा पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
यापूर्वी राजकीय नेत्यांची पोस्टरबाजी आपण पाहिली होती. नेत्यांचे वाढदिवस, विशेष कामगिरी यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पोस्टर्स लावले जात होते. तर कधी टीका करणारी, एखादा मुद्दा लावून धरणारी पोस्टर्सही पाहायला मिळतात. परंतु, आता प्रेमासारखी वैयक्तिक भावना देखील पोस्टरद्वारे जगजाहीर केली जात आहे.