Fact Check: संसर्गाची दुसरी लाट ही कोरोना विषाणूची नाही? 5G Tower Radiation मुळे लोक आजारी पडत असल्याचा दावा, जाणून घ्या काय आहे सत्य

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, कोरोना विषाणू अशा अनेक देशांमध्ये पसरला आहे जिथे 5 जी नेटवर्क अद्याप पोहोचलेले नाही.

Fake News on COVID-19 (Photo Credits: PIB)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामध्ये अनेक खोट्या बातम्या, अफवा यांना ऊत आला आहे. सध्या कोरोनाच्या बाबतीत सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत दिशाभूल करणारी माहिती व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तसेच जनतेमध्येही एक अफवा आहे, ती म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग हा 5 जी टॉवर चाचणीचा परिणाम आहे. म्हणजेच 5 जी टॉवरच्या (5G Tower) चाचणीमुळे कोरोना विषाणू इतक्या वेगाने पसरत आहे. या दाव्याची चौकशी पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने केली असून तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

पीआयबीने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'सध्या कोरोना असे संबोधली जाणारी महामारी ही कोरोना नसून 5 जी टॉवर चाचणीचा दुष्परिणाम असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा आहे. जागतिक महामारी कोविड-19 च्या संदर्भात अशी चुकीची माहिती शेअर करू नका. योग्य माहितीसाठी केवळ अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा.’

महत्वाचे म्हणजे अशा दाव्यांचा वैज्ञानिकांनीही निषेध केला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोविड-19 आणि 5 जी तंत्रज्ञानामधील संबंध पूर्णतः चुकीचा आहे. जैविकदृष्ट्या ते शक्य नाही. शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की, जे लोक अशा पोस्ट्स शेअर करीत आहे ते कॉंस्पेरेसी थियरीला प्रोत्साहन देत आहेत, ज्याद्वारे 5-जी च्या मदतीने कोरोना विषाणूचा संसर्ग पसरवण्याचे खोटे दावे केले जात आहेत. अशा दाव्यांमुळे ब्रिटनमध्ये आपला फोन जाळून टाकल्याच्याही घटना घडल्या आहेत.

(हेही वाचा: Fact Check: शाकाहार आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना COVID-19 चा धोका कमी? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

याआधी डब्ल्यूएचओनेही सांगितले होते की, कोरोना विषाणू हा रेडिओ लहरी किंवा मोबाइल नेटवर्कद्वारे पसरत नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, कोरोना विषाणू अशा अनेक देशांमध्ये पसरला आहे जिथे 5 जी नेटवर्क अद्याप पोहोचलेले नाही. दरम्यान, एका अंदाजानुसार सध्या जवळपास 125 दूरसंचार कंपन्यांनी कमर्शियल 5 जी तंत्रज्ञान सुरू केले आहे, त्यापैकी बहुतेक अमेरिकेत आहेत.