सीवूड्सच्या ग्रॅन्ड सेंट्रल मॉलमध्ये साकारलं विराट कोहलीचं दिव्यांच्या सहाय्याने सर्वात मोठं चित्र
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा 'रनमशीन' या नावाने ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानात त्याची तुफान खेळी पहायला जशी गर्दी जमते तसेच त्याचे चाहते मैदानाबाहेर आहेत. यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा 30 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन म्हणून दिव्यांचा वापर करून त्याचे चित्र उभारण्यात आलं आहे.
नवी मुंबईतील ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये विराट कोहलीचं छायाचित्र रंगीत दिव्यापसून बनवलं आहे. आबासाहेब शेळके या कलाकाराने विराटचं चित्र साकारलं आहे. या प्रमिमेसाठी आबासाहेबने सुमारे 5244 मातीच्या दिव्याचा वापर केला आहे. दिव्यापासून तयार केलेली ही कलाकृती जगातील सर्वात मोठ्या कलाकृतींपैकी एक आहे. विराटचा हा फोटो दहा बाय सोळा फूट उंचीचा आहे. यामध्ये सहा विविध रंगांचे दिवे वापरण्यात आले आहेत.
नुकताच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. वेगाने दहा हजार धावांचा टप्पा पार करण्यामध्ये सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडीत काढला आहे. यंदाचा विराटचा वाढदिवस दिवाळीदरम्यान आला आहे तसेच लग्नानंतरचा त्याचा पहिला बर्थ डे असल्याने तो खास आहे.
सीवूड्सच्या ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये विराटच्या फोटोची प्रतिकृती ही 10 नोव्हेंबरपर्यंत रसिकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.