Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात शनिवारी आणि रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी

संपूर्ण ऑक्टोबरमध्ये मुंबई, कोकण प्रदेश आणि गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rains | X @ANI

Mumbai Weather Update: तीन दिवसांच्या तीव्र उष्णतेनंतर शुक्रवारी दुपारी पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) आणि दक्षिण कोकणात (South Konkan) शनिवार आणि रविवारसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये मुंबई, कोकण प्रदेश आणि गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या महिन्यात 18 दिवसांत गोव्यात 110 टक्के जास्त पाऊस झाला आहे, तर महाराष्ट्रात एकूण सरासरीपेक्षा चार टक्के कमी पाऊस झाला आहे. मुंबई शहरात अतिवृष्टी झाली आहे, तर उपनगरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यातही अतिरिक्त पाऊस झाला असून पालघरमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रायगड आणि रत्नागिरीने पावसाची सरासरी ओलांडली असून, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. (हेही वाचा -Mumbai Rain Alert: मुंबईत अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत, ट्रॅफिक जाम, पाणी साचून वीजपुरवठा खंडित)

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, मराठवाड्यात धाराशिव आणि विदर्भात बुलडाणा तसेच पुण्यात पावसाची नोंद झाली आहे. तथापी, पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची प्रणाली तयार झाली आहे, ज्यामुळे कोकणात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी डहाणूमध्ये 49 मिमी पावसाची नोंद झाली असून मुंबईत संध्याकाळी उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. (हेही वाचा - Rain-Related Deaths in Marathwada: यंदा मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने 38 लोकांनी गमावला जीव)

हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज वर्तवला असून वीकेंडमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागात-छत्रपती संभाजी नगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव-आणि विदर्भासह वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम येथेही शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.