Cyclone Nisarga Updates: मुंबई, ठाणे, रायगड येथे 120 kmph वेगाने वारे वाहणार- IMD
तर उद्या सकाळपर्यंत निसर्ग चक्रीवादळ निवळेल, असा अंदाज मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ तीव्र होऊ लागलं आहे. दुपारी साधारण 1 ते 4 च्या दरम्यान हरिहरेश्वर आणि दमण यादरम्यानच्या किनारपट्टीवरुन जाणार आहे. हा भाग अलिबाग पासून जवळ आहे. त्या दरम्यान वाऱ्याचा वेग 100-120 kmph इतका मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात असेल, अशी माहिती IMD चे DGM मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर येथे वाऱ्याचा वेग 80-90 kmph इतका असेल. तर गुजरातमधील नवसारी, वलसाड येथे वाऱ्याचा वेग काहीसा कमी होईल असा अंदाज आहे. तरी या भागात 60-80 kmph ने वारे वाहतील. आज मध्यरात्री पासून वादळाची तीव्रता कमी होऊ लागेल. तर उद्या सकाळपर्यंत निसर्ग चक्रीवादळ निवळेल, असा अंदाज मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे.
रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी इतका वाढला असून समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या आहेत. दरम्यान हे वादळ दापोली पर्यंत दाखल झाले असून त्याची गती वाढली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे.
ANI Tweet:
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी (Commissioner of Police) कलम 144 अंतर्गत संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. चक्रीवादळापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत असून प्रशासनानेही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारे तयारी केली आहे.