शिवसेनेच्या भूमिकेनंतर अनेकांचे कोमेजलेले मेंदू हालचाल करू लागले; संघ परिवाराच्या अयोध्येतील ‘हुंकार रॅली’वरुन उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी

आता 25 तारखेस भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद वगैरे लोक राममंदिरासाठी जो काही ‘हुंकार’ उत्सव साजरा करीत आहेत त्याबद्दल आमच्या मनात कटुता अथवा द्वेष नसून त्यांच्या हुंकाराचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेही ठाकरे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख (Representative Image)

शिवसेनेने राममंदिरासाठी अयोध्येत जाऊन धक्का देण्याचा मुहूर्त जाहीर करताच अनेकांचे कोमेजलेले मेंदू हालचाल करू लागले आहेत. कालपर्यंत झोपलेल्यांनी आता ‘हुंकार’ वगैरे भरून सांगितले की, राममंदिर व्हायलाच हवे व आम्ही त्यासाठी आंदोलन करू. हा शिवसेनेच्याच भूमिकेचा विजय आहे. मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेताच पहिल्या सहा-एक महिन्यांत राममंदिरासाठी हुंकार भरले असते तर एव्हाना रामाला हक्काचे मंदिर अयोध्येत मिळाले असते, अशी उपहासात्मक टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अयोध्येतील 'हुंकार रॅली'वर केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्द्यावर येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर अल्पावधीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसांची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकी नंतर संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी गरज पडल्यास राम मंदिर प्रश्नी पुन्हा आंदोलन उभारु असे सांगितले. तसेच, आता तर आरएसएसने राम मंदिराच्या उभारणीसाठी 'हुंकार रॅली' काढण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, संघाच्या 'हुंकार रॅली'साठीही २५ नोव्हेंबरचाच मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे संघाच्या या रॅलीवर शिवसेनेने टोलेबाजी केली आहे.

संघाने २५ नोव्हेंबरला काढलेल्या 'हुंकार रॅली'वरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात एक लेख लिहीला आहे. हुंकाराचा मुहूर्त! हे पंचांग कोणाचे? या मथळ्या खाली लिहिलीलेल्या लेखात ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राममंदिर उभारण्यासाठी संघाची 25 नोव्हेंबरला ‘हुंकार रॅली’ होणार आहे. असे कोरडे हुंकार भरून राममंदिराची निर्मिती होणार असेल तर 25 वर्षांपूर्वी आम्ही शेकडो करसेवकांचे बळी का दिले? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. 25 तारखेचा जो काही हुंकार मुहूर्त या मंडळींनी काढला आहे, त्यासाठी नक्की कोणत्या पंचांगाचा आधार घेतला? कारण 25 तारखेस राममंदिराच्या प्रश्नी लढा उभारण्याचे किंवा हुंकार वगैरे भरण्याचे संघाच्या मनात आधी नव्हते. राममंदिर हा एक राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे याचा विसरच पडला होता, पण दसऱ्याच्या शिवसेना मेळाव्यात आम्ही 25 तारखेस अयोध्येस जात असल्याची घोषणा करताच अनेकांची पंचांगे व दिनदर्शिका भिंतीवरच फडफडू लागल्या. शिवसेनेने 25 तारखेस अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेण्याचे ठरवले ही आमच्यासह कोट्यवधी हिंदूंची ‘मन की बात’च म्हणावी लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘बेडर’ विचारांचे हिंदुहृदयसम्राट होते व आम्ही भिंतीवरील दिनदर्शिकांची फडफड न पाहता 25 तारखेस अयोध्येस जाण्याचे ठरवले त्यामागे शिवसेनाप्रमुखांचीच प्रेरणा आहे. तोपर्यंत याप्रश्नी सगळ्यांचीच ‘सामसूम’ व तोंड बंद आंदोलन सुरू होते. आता 25 तारखेस भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद वगैरे लोक राममंदिरासाठी जो काही ‘हुंकार’ उत्सव साजरा करीत आहेत त्याबद्दल आमच्या मनात कटुता अथवा द्वेष नसून त्यांच्या हुंकाराचे आम्ही स्वागत करीत आहोत, असे ठाकरे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. (हेही वाचा, राम मंदिर प्रश्नावरून संघाकडून काढण्यात येणार 'हुंकार रॅली'; 25 नोव्हेंबर रोजी नागपूरमधून सुरुवात)

दरम्यान,‘हुंकार’ मंडळींनी त्यांचा वेगळा मंच 25 च्या मुहूर्तावर अयोध्येतच उभारला व त्यासाठी साधू, संत, महंतांना आमंत्रित केले. त्या मंचास आमचा सादर प्रणामच आहे. राममंदिरप्रश्नी असे वेगवेगळे ‘मंच’ प्रदर्शन करणाऱ्यांनीच रामास वनवासात पाठवले आहे काय? असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. शिवसेनेने 25 च्या मुहूर्तावर अयोध्येत पाऊल ठेवण्याचे ठरवले म्हणून त्यात हा खोडा घालण्याचा प्रयत्न आहे असे कुणी म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न. आम्ही यास षड्यंत्र, टांग मारणे, खोडा घालणे वगैरे मानत नाही. किंबहुना शिवसेनेने राममंदिरासाठी अयोध्येत जाऊन धक्का देण्याचा मुहूर्त जाहीर करताच अनेकांचे कोमेजलेले मेंदू हालचाल करू लागले आहेत. कालपर्यंत झोपलेल्यांनी आता ‘हुंकार’ वगैरे भरून सांगितले की, राममंदिर व्हायलाच हवे व आम्ही त्यासाठी आंदोलन करू. हा शिवसेनेच्याच भूमिकेचा विजय आहे. मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेताच पहिल्या सहा-एक महिन्यांत राममंदिरासाठी हुंकार भरले असते तर एव्हाना रामाला हक्काचे मंदिर अयोध्येत मिळाले असते, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.