औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराला विरोध करणा-यांना खरी शिवसेना दाखवून देऊ- चंद्रकांत खैरे

दरम्यान "औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराला विरोध करणा-यांना खरी शिवसेना दाखवून देऊ" अशी भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली

Chandrakant Khaire (Photo Credits-Twitter)

औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) नामांतरावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर सर्वच राजकीय आपापली बाजू मांडत असून काँग्रेसने औरंगाबादचे नामांतर होऊ द्यायचे नाही अशी भूमिका घेतली आहे. तर शिवसेना नामांतर करण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. दरम्यान "औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराला विरोध करणा-यांना खरी शिवसेना दाखवून देऊ" अशी भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

तसेच "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले. आता असंच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असं सांगितलं", असं चंद्रकांत खैरे म्हणाले.हेदेखील वाचा- Congress Vs Shiv Sena: महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार? औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला दिला 'असा' इशारा

काँग्रेस, मनसे आणि भाजपने औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेनेला कुणीही कोंडीत पकडू शकत नाही असा दावा देखील खैरे यांनी केला आहे.

नामांतराचा विषय हा श्रद्धेचा असतो. हा मुद्दा खरंतर क्लिअर केला पाहिजे. संभाजी महाराजांचे शेवटचे चार महिने इथे गेले. त्यामुळे या शहराचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.

याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनीदेखील शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. हे सरकार तीन पक्षांचे आहे. मात्र, सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणेल तर, नक्कीच नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.