Western Railways: 'पश्चिम रेल्वे' ची मान्सूनपूर्व तयारी, ड्रोन मार्फत सर्वेक्षण आणि नालेसफाईला सुरवात
रेल्वेचे बरेच गोंधळ दरवर्षी पावसाळ्यात समोर येत असतात यावर खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिका व मीरा भाईंदर आणि वसई-विरार पालिकेच्या मदतीने पश्चिम रेल्वे मान्सून पूर्व कामांचे नियोजन करत आहे.
पावसाच्या सरींसोबत हातात हात घालून येणाऱ्या रेल्वेच्या समस्या काही मुंबईकरांना नवीन नाहीत, मात्र दरवर्षीच्या या तक्रारींवर यंदा पश्चिम रेल्वेने कायमचा तोडगा काढण्याची तयारी दाखवली आहे. आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay) सहाय्याने बनवलेल्या ड्रोन्सचा (Drones) वापर करून सध्या मुंबईतील अधिक पुराची शक्यता असणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व रुळाशेजारील नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवार पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाने सध्या चांगलीच गती घेतली असून सध्या 60 टक्के काम पूर्ण झाले आहे तर उर्वरित काम हे येत्या 30 मे पर्यंत पूर्ण होईल असे असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
नाल्यांच्या सफाई कडे विशेष लक्ष
पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमा अंतर्गत वसई ते विरार दरम्यान तीन भूमिगत नाले तयार केले जात आहेत, यातील दोन नाल्यांची सफाई काहीच दिवसात पूर्ण होईल या सोबतच विरार ते नालासोपारा दरम्यान रुळांना समांतर तसेच वसई-विरार खाडीला जोडून असलेल्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान 53 नाले असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केली जातात. तूर्तास 37 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. यातील 16 नाल्यांची सफाई कामे बाकी असून 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जून आणि ऑगस्ट 2019 पर्यंत दुसऱ्या टप्प्यात नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले जातेय.
सर्वाधिक धोका या स्थानकांना
ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि वसई ते विरार दरम्यान रुळावर पाणी साचण्याचा धोका आहे. त्यानुसार या स्थानकांदरम्यान रुळांची कामे, नालेसफाईची कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. या भागांत 154 पंप मशिन बसवले जाणार आहेत.
RRB Recruitment 2019-20: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; रेल्वेमध्ये 4 लाख जागांसाठी होणार भरती
येत्या मान्सून काळात अधिक पावसाची शक्यता असणाऱ्या दिवसांचा अंदाज लावून या दिवशी काय काळजी घ्यावी हे सांगणारे एक सूचना पत्रक कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. याशिवाय रेल्वेच्या सुरळीत कामकाजासाठी इंसुल्टेअर ची सफाई, पादचारी पुलांचे सर्वेक्षण, ओव्हरहेड वायर्सची जोडणी व अर्थिंगची तपासणी देखील करण्यात येत आहे.
हवामान खात्याची मदत घेत मुंबई व उपनगरातील सहा रेल्वे स्थानकावर पावसाचा अंदाज घेणारी स्वयंचलित अद्ययावत यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, महालक्ष्मी, वांद्रे, दहिसर, मीरा रोड, भाईंदर स्थानकांचा समावेश असेल. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.