'मुंबई पोलिसांचा अभिमान पुन्हा मिळवून देऊ'; पोलिस आयु्क्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर Hemant Nagrale यांचे वक्तव्य
मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असे नुकताच पोलिस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारलेले नवे आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी म्हटले आहे.
"मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन", असे नुकताच पोलिस आयुक्त (Mumbai Police Commissioner) पदाचा कारभार स्वीकारलेले नवे आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी म्हटले आहे. पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस ते बोलत होते. "सध्या घडलेल्या काही वाईट घटनांमुळे मुंबई पोलिस कठीण परिस्थितीतून जात आहेत. परंतु, आपण सर्वांच्या, सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही समस्या सोडवली जाईल आणि आम्ही मुंबई पोलिसांचा अभिमान पुन्हा मिळवून देऊ," असे नगराळे म्हणाले. तसंच सध्या सुरु असलेल्या तपासणीवर मी काही भाष्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"आम्ही कायद्यानुसार काम करु आणि सर्व अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार आपले कर्तव्य बजावावे", अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसंच ते पुढे म्हणाले की, "या गुन्हाबाबतचा तपास एनआयए आणि एटीएस करत असून तो योग्य रीतीने होईल, अशी मला खात्री आहे. यात जे कोणी सहभागी आणि दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ANI Tweet:
(हे ही वाचा: मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीया)
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडणं त्यानंतर त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू हे प्रकरण राज्यात चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणी एपीआय सचिन वाझे यांच्यावर निलंबन, अटकेची कारवाई झाल्यानंतर आता मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करत हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त झाले आहेत. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.